लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे 6 डिसेंबर :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या 24 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
कर्नाटकमधील बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले. या गाड्या रोखल्या. तसेच बेळगाव आणि इतर मराठी भाषिक परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातंय. यामुळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचाही बांध फुटतोय. या सर्व विषयांवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, देशाला ज्यांनी संविधान दिलं. थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे.
महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्ता रोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
हे पण वाचा :-