लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ०७ : लोकशाही व्यवस्थेत टीका ही अनिवार्य आणि आवश्यक बाब आहे. पत्रकार आणि राजकारणी हे नेहमीच टीकेच्या केंद्रस्थानी असतात. सरकारच्या चुका दाखवून देणे हा पत्रकारांचा घटनात्मक अधिकार असला, तरी मांडलेली बाब तपासून, सत्य पडताळून लिहिणे ही तितकीच मोठी जबाबदारी असल्याचे स्पष्ट मत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त गडचिरोली प्रेस क्लबतर्फे आयोजित जिल्हा गौरव पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यशस्वी पत्रकारितेसाठी ‘सोर्स’ मजबूत असणे अत्यावश्यक असल्याचा सल्ला देत वडेट्टीवार म्हणाले, “माझ्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत पत्रकारांचा वाटा सर्वाधिक आहे,” अशी जाहीर कबुली त्यांनी यावेळी दिली. माध्यमांमध्ये आपल्याबद्दल चांगल्या बातम्यांसोबत कधी टीकात्मक बातम्याही प्रसिद्ध झाल्या, मात्र कोणत्याही कारणाने सतत बातम्यांमध्ये ठेवून पत्रकारांनीच आपल्याला मोठे केले, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी पार पडलेल्या या समारंभात शैक्षणिक, हॉटेलिंग व्यवसायासोबतच विविध सामाजिक उपक्रमांत उल्लेखनीय योगदान देणारे अझिझ नाथानी यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
आपल्या भाषणात वडेट्टीवार यांनी पत्रकारांच्या सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. “लेखणी शाबूत राहिली, तरच लोकशाही टिकेल. मात्र आज पत्रकारांच्या व्यथा वाढल्या आहेत. मालकांकडून होणारे शोषण ही वस्तुस्थिती आहे,” असे परखड मत त्यांनी मांडले. गडचिरोलीकरांमध्ये क्रीडा क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्याची क्षमता असून, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जिल्हा नव्या उंचीवर जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “कधी काळी गडचिरोलीतून लोक बाहेर जात होते; आज मात्र बाहेरून लोक इथे येत आहेत,” असे सांगत त्यांनी बदलत्या गडचिरोलीचे चित्र उभे केले.
सत्कारमूर्ती अझिझ नाथानी यांच्याविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मी विदेशात असतानाही हा कार्यक्रम नाकारू शकलो नाही. नाथानी हे माझ्या लहान भावासारखे आहेत. त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेले काम अभिमानास्पद आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आमदार रामदास मसराम, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, हिंदुस्तान टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे अध्यक्षस्थानी होते.
अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी समाजाच्या प्रगतीत प्रसारमाध्यमांची भूमिका अधोरेखित करत जिल्हा गौरव पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचीच निवड होते, असे सांगत प्रेस क्लबचे कौतुक केले. आमदार रामदास मसराम आणि नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर भाष्य केले. तर ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी पत्रकारांसमोरील आव्हाने, अडचणी आणि त्यांच्यासाठी नागपुरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना अझिझ नाथानी यांनी गडचिरोलीकरांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे यांनी केले. संचालन प्रा. संध्या येलेकर यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष रुपराज वाकोडे यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय सचिव शेमदेव चाफले यांनी करून दिला.