संजय गांधी निराधार योजनेच्या ४११ लाभार्थ्यांचे वर्षभराचे थकित अनुदान तात्काळ द्या — अन्यथा भाकपचे बेमुदत ठिय्या आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

आरमोरी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र असलेल्या ४११ लाभार्थ्यांचे मासिक अनुदान जानेवारी २०२५ पासून बंद असून, ते तात्काळ सुरू करून थकबाकी अदा करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

भाकपचे जिल्हा सेक्रेटरी काॅ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी महिला व पुरुषांनी निवेदन देत सांगितले की, योजनेतील बहुतांश लाभार्थी विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिला असून त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. याबाबत यापूर्वीही निवेदने व विनंती अर्ज सादर करण्यात आले; मात्र अद्याप अनुदान सुरू झालेले नाही.

अनुदान बंद असल्याने अनेक महिलांवर उपासमारीची वेळ आली असून, संबंधित लाभार्थ्यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभही घेतलेला नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे थकित अनुदान तात्काळ सुरू करून संपूर्ण रक्कम अदा करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

अन्यथा दि. २९ डिसेंबर २०२५ पासून तहसील कार्यालय, आरमोरी समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

Comments (0)
Add Comment