निसर्गाच्या बदलत्या चक्राचा शेतीवर परिणाम, राज्यातील पिकांचे उत्पादनात घट शेतकरी हवालदिल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई – अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा तसेच हवामान बदलामुळे या निसर्ग चक्रावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे.  साहजिकच याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांनाही बसत असून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, तापमानातील बदल, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे उत्पन्न १० ते २० टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास येत आहे.

नुकतेच कृषी मंत्र्यांनीही गहू, तांदूळ, मका, सोयाबीन अशा पिकांमध्ये येत्या ३० वर्षात त्याची उत्पादकता कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहेत. त्याचबरोबर ‘ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स’नुसार हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. राज्यातील शेती ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंवर अवलंबून आहे. या ऋतू चक्रावरील थेट परिणाम शेतीतील उत्पन्नाला प्रभावित करत आहे. खरिपातील अवर्षण हे पिकांचे नुकसान करते, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे कोरडवाहू शेतीच्या पेरणीचे वेळापत्रक बिघडले आहे, याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर झाल्याचे चित्र आहे.

सततच्या  तापमानातील बदलांमुळे मातीची उत्पादकता कमी होते आणि पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. आधुनिक शेती पद्धती, रासायनिक खते याचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

२०५० पर्यंत तांदूळाच्या उत्पादनात २० टकक्यांनी घट ?
केंद्रीय कृषीमंत्री राजन चौधरी यांनी लोकसेत सांगितले की, पावसावरील आधारित तांदूळ उत्पादनात २०५० पर्यंत २० टक्के तर २०८० पर्यंत ५० टकक्यांनी घट होण्याची शक्यता आहे. याचसोबत गव्हाचे उत्पादन २० टक्के तर २०८० पर्यंत १४ टकक्यांनी घटण्याची शक्यता आहे. याचसोबत मक्याचे उत्पादन २०५० पर्यंत १८ टक्के तर सोयाबीन ३ ते १० टक्कयांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अग्रोवन या आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करणारे अनिल जाधव या गोष्टीला पुष्टी देतात. ”बदलत्या वातावरणामुळे कमी दिवसात जास्त पाऊस, पावसात मोठे खंड, अवकाळी पाऊस, जास्त उष्णता अशा घटना वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर होत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. शेतकरी तर अडणीत येत आहेतच शिवाय भारताची आयातही वाढताना दिसत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्या वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी आपल्याला इतर देशांवरील अवलंबित्व वाढत जाईल.”

कापूसाच्या उत्पादनातही घट
गणेशराव नानोटे हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके घेतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे शेतकरी आयडॉल म्हणून त्यांची निवड झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षात तापमान बदलाचा शेतीवर परिणाम झाल्याचा त्यांचा अभ्यास आहे. आधी अकोला जिल्ह्यात पाऊस हा दरवर्षी ७०० ते ७३० मिलिमीटर एवढा होतो. मात्र यंदा जास्त पडल्याने तसेच कधी ढगफुटी सदृश तर पावसात खंड कापसावर त्याचा परिणाम झाला. पिकाला रसशोषक कीड आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला . त्यामुळे माझे १०% नुकसानही झाले आणि परिणामी दरवर्षी एक एकरी ९ ते १० क्विंटल वर येणारे पावसाचे उत्पादन यंदा फक्त ७ ते ८ क्विंटलवर आले असल्याचे ते सांगतात.

लेखक ,

मानसी जोशी

हे ही वाचा,