लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांनी आज चंद्रपूर ते वडसा रेल्वे मार्गाचा सखोल पाहणी दौरा केला. रेल्वेच्या गतीशीलतेचा अनुभव घेण्यासाठी ‘स्पीड ट्रायल’ घेतली गेली. या दौऱ्यात त्यांनी स्थानकांपासून ते ट्रॅक, ब्रिज, पॉइंट अॅण्ड क्रॉसिंग, टर्नआऊट आणि लेव्हल क्रॉसिंग गेटपर्यंत प्रत्येक घटकाचा बारकाईने आढावा घेतला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसह अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती महाप्रबंधकांनी घेतली. विशेष म्हणजे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चांदा फोर्ट स्टेशनचा विकास झपाट्याने सुरू असून, हे स्टेशन भविष्यात एक महत्त्वाचे इंटरचेंज केंद्र ठरणार आहे.
यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघ, आणि रेल्वे कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचनाही ऐकल्या. स्टेशनवर नवीन सुविधा, प्लॅटफॉर्म विस्तार, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा, दुहेरीकरण आणि चंद्रपूर शहराशी डायरेक्ट जोडणी अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
चंद्रपूर-वडसा मार्गावर प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायक सेवा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन अत्यंत जागरूक असून या भागातील प्रवाशांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.