लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण सहपालक मंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास खासदार डॉ. नामदेव कीरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविष्यात पंडा, पोलिस अधीक्षक निलोत्पाल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अप्पर पोलिस अधीक्षक एम. रमेश, माजी खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, जनप्रतिनिधी, विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी आपल्या मनोगतात अॅड. जयस्वाल यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा गौरव करताना, “गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीला पोलीस विभागाने दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. जिल्हाधिकारी यांचे नियोजन व कार्यपद्धती स्तुत्य असून प्रशासनाच्या एकजुटीमुळे विकासाला नवी गती मिळत आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमात शहीद वीर जवानाच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय कार्यालयांतील उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, सामाजिक कार्यात झोकून देणारे नागरिक, तसेच आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.