सासरचं घर ठरलं नरक… पती, सासू, नणंदसह आठ जणांविरोधात विवाहितेवर बलात्कार, वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा : जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेला जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून तिच्यावर दोन दिवस घरात डांबून ठेवत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती, सासू, नणंदसह आठ जणांविरोधात जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी अशा अमानुष वागणुकीचा सामना करावा लागलेली ही महिला आज मानसिक आणि शारीरिक आघातात आहे. पती आणि नणंद यांनी मिळून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आणि जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा इतर पुरुषांना बोलावून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला, असा आरोप तिने पोलिसांत नोंदवला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, समाजमन सुन्न झालं आहे.

पती, सासू आणि नणंद यांच्याच सांगण्यावरून इतर आरोपींनी पीडित महिलेला घरात डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केला. केवळ आर्थिक फायद्यासाठी आपल्या पत्नीला नरकयातना देणाऱ्या या प्रकारामुळे सासरचं घर म्हणजे स्त्रीसाठी सुरक्षित आधार आहे की छळाचं दुसरं नाव, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

‘माहेरपासून विश्वासाने पाठवलेलं घर जर असं नरक बनत असेल, तर आई-वडिलांचा विश्वास तरी कुठे जाईल?’ असा सवाल या घटनेमुळे अनेक पालक विचारू लागले आहेत. समाजात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो, पण अशा घटनांनी केवळ चिंता नाही तर रोषही वाढत आहे.

पोलीस अधिक तपास करत असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.