मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याची झोळी रिकामी, धर्मरावबाबांचे मंत्रिपद हुकले !

मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याची पाटी कोरीच : कार्यकर्त्यांचा झाला हिरमोड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 गडचिरोली : दि. १६ डिसेंबर,  विदर्भातील राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रमुख चेहरा तसेच आदिवासी नेते म्हणून धर्मरावबाबा यांची ओळख असून  सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेल्या धर्मरावबाबा यांना यावेळच्या निवडणुकीत कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांनी बंडखोरी करत आव्हान दिले होते. त्यामुळे अहेरीतील नात्यागोत्याची लढत राज्यभर चर्चेत होती. धर्मरावबाबा यांनी आपला गड राखून वर्चस्व सिद्ध केले होते. परंतु धर्मरावबाबांना मंत्रिपदाने  हुलकावणी दिली आहे.

कन्या व पुतणे अशा कुटुंबातील दोघांनी खिंडीत पकडूनही मोठ्या फरकाने विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिमंडळ विस्तारात शेवटच्या क्षणी डावलण्यात आले. शिवाय पहिल्यांदाच विधानसभेत गेलेले भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांनाही संधी मिळाली नाही. त्यामुळे धर्मरावबाबा समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. जिल्ह्यात तीनपैकी दोन जागांवर महायुतीने विजय मिळविला. २०२३ मध्ये धर्मरावबाबा आत्राम कॅबिनेट मंत्री होते.

२०२४ मध्ये महायुती सरकारच्या बाजूने कौल देऊनही विदर्भातील राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रमुख चेहरा तसेच आदिवासी नेते म्हणून धर्मरावबाबा यांची ओळख असूनही  मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याची झोळी रिकामी  राहिली. अहेरीतील नात्यागोत्याची लढत राज्यभर चर्चेत होती. धर्मरावबाबा यांनी आपला गड राखून वर्चस्व सिद्ध केले होते. यापूर्वी तीनवेळा राज्यमंत्रिपद, मागच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषविणाऱ्या धर्मरावबाबा हे यावेळी देखील मंत्रिपदाचे दावेदार होते, पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाव आश्चर्यकारकरीत्या मागे पडले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा पसरला  धर्मरावबाबा आत्राम हे प्रदीर्घ अनुभवी नेते आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आठवेळा विधानसभा निवडणूक लढवली. त्यातील तीन निवडणुकांत त्यांना हार पत्करावी लागली, पण पाचवेळा त्यांनी विजय मिळविला. मंत्रिपदाच्या अपेक्षेने अनेकांनी उपराजधानी गाठली होती, पण त्यांना निराश होऊन परतावे लागले.

दुसरीकडे नवखे असले तरी भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांना सुशिक्षित व तरुण चेहरा म्हणून अपेक्षा होती, पण त्यांचा पण त्यांचाही भ्रमनिरास झाला. गडचिरोली  जिल्हा नक्क्षल प्रभावित असून आता विकासाकडे झेपावत आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लोह खनिज उत्खनन, त्यावर आधारित पोलाद निर्मिती प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. त्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाचे वेगळे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्रिपद कोणाकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याची  पाटी कोरीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडेच पालकमंत्रिपद ठेवतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पालकमंत्री होऊन जिल्ह्याची सूत्रे आपल्या हाती घेतात, याची जिल्हावासियात उत्सुकता आहे.