निसर्गाच्या सानिध्यात बच्चेकंपनीने केली धमाल

पारंपरिक खेळांसह चित्रकलेची मज्जा: किलबिल नेचर क्लबचे ‘मामाच्या गावाला जाऊया’ शिबिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ मार्च: मोबाईलच्या आभासी विश्वात गुंग झालेल्या बालगोपालांना पूर्वीप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक खेळ खेळत मज्जा करता यावी, यासाठी किलबिल नेचर क्लबच्या वतीने आयोजित ‘‘मामाच्या गावाला जाऊया” या अनोख्या दोनदिवसीय शिबिरात बच्चेकंपनीने धमाल केली.

गडचिरोली शहरालगत असलेल्या चांदाळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर आश्रमशाळेत शनिवार (ता. २०) व रविवार (ता.२१), असे दोन दिवस हे अनोखे शिबिर पार पडले. या शिबिरात वसंत विद्यालय, पंडित जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, कमलताई मुनघाटे हायस्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टिव्हीनंतर मोबाईलचे युग सुरू झाल्यावर बालकांची कंचे, लगोरी, टिक्करगोटी, सायकलचे टायर फिरवणे, चौकाअष्टा, किल्ले तयार करणे अशा अनेक खेळांपासून ताटातूट झाली आहे. त्यामुळे मोबाईलचे डबडे काही काळ दूर ठेवून पुन्हा जुन्या खेळांत बालकांनी रमावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुले मामाच्या गावाला जाऊन धमाल करायची. म्हणून चांदाळा येथील आश्रमशाळेतच हे मामाचे गाव तयार करण्यात आले. येथे मुलांसाठी उभारलेले तंबू या शिबिराचे खास वैशिष्ट्य होते. या शिबिराच्या पहिल्या दिवशी शिबिरार्थ्यांना पाटावर उभे ठेवून त्यांना हातपाय धुवायला लावून पारंपरिक पद्धतीने टिळा लावून औक्षण करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या दिवशी इतर अनेक पारंपरिक खेळांसह डॉ. विनोद बिटपल्लीवार यांनी लँड स्केपिंग हा चित्रकलेचा प्रकार मुलांना शिकवला. विशेष म्हणजे त्यांनी मुलांपुढेच एक लाइव्ह चित्र काढून दाखवले. कोंबडीची पिसे आणि दाभणाचा वापर करून डार्ट तयार करत कलिंगडावर नेम धरण्यात आला. शिवाय गुलेर, कंचे आदींची व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळी गावालगत वनभ्रमंती करण्यात आली. यावेळी बहरलेल्या पळसवृक्षांमध्ये फिरताना मुलांनी खाली पडलेली पळसफुले गोळा केली..

यावेळी त्यांना पळसाचे आयुर्वेदिक महत्त्व व अनेक उपयोग सांगण्यात आले. त्यानंतर मुलांनी मातीचे सुबक किल्लेही तयार केले. रात्री निसर्ग अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, जीवाश्म आदींची सविस्तर माहिती दिली. काही सत्र रात्री छोटी शेकोटी पेटवून कॅम्प फायरमध्ये घेण्यात आली.

यावेळी शिबीरार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यानंतर पारंपरिक नृत्याचाही सर्वांनी आनंद घेतला. दुस-या दिवशी चित्रकार अनिल बारसागडे यांनी शिबिरार्थ्यांना वारली पेंटिंग शिकवली. या चित्रकला वर्गात मुलांनी पेंटिंग शिकून लगेच शाळेच्या भिंतींवर सुरेख वारली चित्रांची पेंटिंगसुद्धा केली. हेमंत जंबेवार, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, राजूभाऊ इटनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन हेमके, सतीश चिचघरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या शिबिरात मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, क्रेन्स संस्थेच्या सचिव अंजली कुळमेथे, मुख्याध्यापक शेमदेव चाफले, सुधीर गोहणे, शिक्षिका मीरा बिसेन- चौधरी यांनी शिबिर संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली. शिबिरासाठी प्राचार्य सागर म्हशाखेत्री, शरद डोके, अतीश उरकुडे, खुशाल ठाकरे आदींनी सहकार्य केले.

शिबिराच्या दुस-या दिवशी जागतिक वनदिनानिमित्य वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके यांनी शिबिरार्थ्यांसाठी वनभ्रमंती आयोजित करून हे शिबिर अविस्मरणीय केले. गुरवळा गावाजवळच्या जंगल परिसरात जवळपास ३६ किमी अंतर वाहनांतून भटकंती करत शिबिरार्थ्यांनी चितळ, नीलगाय, भेकर, रानकुत्रे, असे अनेक वन्यजीव व विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले. या वनभ्रमंतीमुळे शिबिरार्थ्यांना निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन विविध प्रकारची माहिती जाणून घेता आली. यावेळी सर्वांनी वनसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.

Nature Club