लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वाघदरा येथील अवैध दारूविक्री करणाऱ्या घरपरिसराची पाहणी करून ५० टिल्लू देशी दारू ३ हजार रुपये किमतीची नष्ट केल्याची घटना मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या केली. तसेच गावात अवैध दारूविक्री करताना पुन्हा आढळून आल्यास पोलिस विभागा कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
मुक्तिपथ संघटना व वाघदरा गाव ग्रामस्थांनी आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार केलेली होती. परंतु, गावातील दोन मुजोर दारू विक्रेत्यांनी मागील तीन महिन्यांपासून चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केला. यामुळे गाव संघटनेच्या महिलांनी विक्रेत्यांना वारंवार सूचना करून अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना देऊन सुद्धा दारू बंद केली नव्हती.
दारू विक्रेते काही दिवस दारूविक्रीचा व्यवसाय बंद करून पुन्हा सुरु करीत होते. ३० डिसेंबर रोजी मुक्तिपथ टीमने गावत भेट दिली असता, गाव संघटनेच्या महिलांनी आपल्या गावात अवैध दारूविक्री सुरु असल्याची माहिती दिली. त्यानंतर गावातील पोलिस पाटील, गाव संघटनेच्या महिला व मुक्तिपथ तालुका टीमने दारू विक्रेत्यांच्या घरी भेट देऊन घर परिसराची पाहणी केली असता, एका विक्रेत्याच्या घरी ३ हजार रुपये किमतीचे ५० टिल्लू देशी दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून गावात पुन्हा दारूविक्री न करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. तसेच पुन्हा दारू विक्री करताना आढळून आल्यास पोलिस विभागाच्या मार्फतीने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे व तालुका प्रेरक विनोद पांडे उपस्थित होते.