लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी,दि 11 ऑक्टोम्बर :– गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असून जिल्ह्यात कुठलेच औद्योगिक कारखाने नाही, जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतीसुद्धा करायचे म्हटले तर सिंचनाची सोय नसल्याने निसर्गावर अवलंबून राहावं लागतं मात्र यावर्षी निसर्गानेही शेतकऱ्याला दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युवक-युवती बेरोजगार झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,
जिल्ह्यात एकमेव असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे तात्काळ उभारण्यात आले तर बेरोजगारांना रोजगार मिळाल्याने काही प्रमाणात का होईना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकातून मागणी केली आहे ,
राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कौश्यारी हे सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या भागातील युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यात यावा आणि कोनसरी येते लोहप्रकल्प उभारण्यात यावे यासाठी प्रसिद्धी पत्रकातून लक्ष वेधले आहे.
पत्रकात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नमूद केले आहे की, जिल्ह्यात कुठलेच उद्योगधंदे नसल्याने सुशिक्षित युवक वैफल्यग्रस्त होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे यासाठी सुरजागड लोहप्रकल्प अत्यावश्यक असून कोनसरी येथे तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात भूमिपूजन झाल्याने लोहप्रकल्प कोनसरी येथे उभारून स्थानिकांना रोजगार द्यावा व महामहिम राज्यपाल यांनी बेरोजगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष घालण्याची मागणी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
जिल्ह्यात प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार प्राप्त झाल्याने बेरोजगारीवर मात करता येईल याशिवाय युवक-युवती या विविध शैक्षणिक पात्रता व आय.टी. आय.चे प्रशिक्षण पूर्ण केलेले युवक , ड्रायव्हिंग शिकून असलेले युवकानाही रोजगाराच्या संधी प्राप्त होईल युवकच प्रत्येक कुटुंबियांचे आधारस्तंभ व आशेचे किरण असल्याचेही आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकात उल्लेख केले असून सध्या दोन हजार युवक एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर वेगवेगळ्या कौशल्याप्रमाणे कामे करीत असून कोनसरी येथे लोहप्रकल्प झाल्यास तब्बल दहा हजार युवकांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकडेही पत्रकात लक्ष केंद्रित केले आहे.
महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गडचिरोली जिल्ह्यात पदार्पण केल्याने स्वागत व आनंद व्यक्त करून युवकांचे आशा पल्लवित झाले असून युवकांच्या भविष्यासाठी व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे यासाठी महामहिम राज्यपाल कोश्यारी यांनी दौऱ्याचा व स्थानिक सुशिक्षित युवकांचा भविष्याचे फलित करण्यासाठी कोनसरी येथे लोहप्रकल्प कारखाना उभारणीसाठी अधिक लक्ष घालतील असेही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन लक्ष वेधले आहे.
राज्यपालांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घ्यावे!
गडचिरोली जिल्हा दुर्गम, अतिमागसला व आदिवासी बहुल असून अविकसित आहे. अविकसित जिल्ह्याला राज्यपाल यांनी दत्तक घेतल्यास विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जास्त अवधी लागणार नाही. राज्यपाल जिल्हा दत्तक घेतल्यास एक वेगळा दर्जा व महत्त्व प्राप्त होईल त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला महामहिम राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांनी जिल्ह्याला दत्तक घ्यावे असे पत्रकात नमूद करून विकासाला चालना व अधिक गती मिळेल असा आशावादही आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले आहे.