गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आत्म समर्पितांच्या नवजीवन उत्पादक संघ उत्पादित फिनाईल चा लोकार्पण सोहळा संपन्न

तसेच गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी “कृषी दर्शन सहल व अभ्यास दौरा” कार्यक्रमाचे आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. १९ नोव्हेंबर : गडचिरोली पोलीस दलासमोर नक्षल चळवळीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल सदस्यांना स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने आत्मसमर्पण शाखेच्यावतीने पुनर्वसनाचे काम केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून आत्मसमर्पितांच्या फ्लोअरक्लिनर फिनाईल ‘Clean101’ वन उद्योगाचे उद्घाटन दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे करण्यात आले.

 

तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्यांचे जीवनमान उंचावून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात हातभार व्हावा या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात राहत असलेल्या एटापल्ली, हेडरी, धानोरा उपविभागातील ४१ शेतकऱ्यांसाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ चे माध्यमातून व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सोनापुर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या “कृषी दर्शन सहल व अभ्यास दौरा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 दिनांक १९ नोव्हेंबर ते दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी पर्यंत आयोजित केलेल्या कृषी दर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिदुर्गम एटापल्ली, हेडरी, धानोरा उपविभागातील ४१ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून या सहली दरम्यान नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, राहुरी, बारामती, पुणे, बाभळेश्वर, औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, पैठण, अंबेजोगाई, परभणी, पोखर्णी तसेच  ताडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र, विविध शेती प्रक्षेत्र तसेच ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत.

यापूर्वी एटापल्ली तालुक्यातील मौजा कोटमी व एटावाही या गावातील ४२ महिलांनी पहिल्या कृषीदर्शन सहलीत तसेच भामरागड तालुक्यातील मौजा नारगुंडा, होडरी, गुंडेनूर, ताडगाव या अतिदुर्गम भागातील ४० शेतकऱ्यांनी दुस-या सहलींमध्ये सहभागी होऊन राज्यातील विविध प्रगत कृषी विद्यापीठ तसेच इतर प्रगतिशील ठिकाणांना भेटी देऊन शेतीचे प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतले होते. तसेच नवजीवन उत्पादक संघातील १० महिला व २ पुरुषांनी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था (एमगिरी) वर्धा यांच्या माध्यमातून दिनांक २४ ते २६ ऑगस्ट २०२१  दरम्यान तीन दिवसीय फ्लोअर क्लीनर फिनाईल चे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले असून त्यांनी आता स्वतःचा उद्योग उभा केला आहे.

आत्मसमर्पित नक्षल सदस्यांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आत्म समर्पितांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता आत्मसमर्पण शाखेच्या माध्यमातून १२ आत्मसमर्पित महिलांचा बचत गट स्थापन करण्यात आला असून त्यांचे नवजीवन उत्पादक संघ असे नामकरण करण्यात आले आहे.

आत्म समर्पित महिलांचा हा बचत गट फ्लोअरक्लीनर फिनाईल “Clean101” चे उत्पादन करत आहे. सदर उत्पादन हे अत्यंत गुणवत्तापूर्ण असून बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये विक्रीस उपलब्ध राहणार आहे. गडचिरोली पोलीस विभाग विक्रीसाठी आत्मसमर्पितांच्या फिनाईल उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. तसेच विक्रीसाठी व प्रचार प्रसारासाठी देखील मदत करणार आहे. नवजीवन उत्पादक संघाकडून उत्पादित केलेली उत्पादने वेगवेगळ्या शासकीय विभागांना तसेच शासकीय व निमशासकीय संस्था यांना विक्री केले गेले आहेत.

यापुढे देखील सर्व शासकीय विभाग तसेच शासकीय व निमशासकीय संस्था यांना हे उत्पादन विक्री केले जाणार आहे. तसेच सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांची २०० लिटर ची ऑर्डर देखील आली आहे.

 सदर दोन्ही कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी तिस-या कृषिदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास पोलीस अधीक्षकांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. तसेच आत्मसमर्पितांना त्यांच्या नवीन उद्योगाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक समय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर गडचिरोलीचे कार्यक्रम समन्वयक तथा प्रकल्प संचालक आत्मा संदीप कराळे विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड उपस्थित होते.

 सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी एटापल्ली सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हेडरी संकेत गोसावी, उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा स्वप्नील जाधव तसेच नागरिक कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सेवा सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी गंगाधर ढगे व दोन्ही शाखेचे अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

कोनसरी येथील लोहप्रकल्प निर्माण कामाचे मोठ्या थाटात व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनाचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

 

gadchiroli policelead news