कुडे गावात आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सुसज्य समाजमंदिराचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

मनोर 03 सप्टेंबर : पालघर तालुक्यातील कुडे गावातील दानशूर व्यक्तींच्या दातृत्वामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं कुडे सातवी पाडा तेथे एक सुसज्य समाजमंदिर बांधण्यात आले आहे. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या समाज मंदिराचे बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते अतिशय जल्लोषात उद्घाटन करण्यात आले.

“मतदार संघात आजपर्यंत अनेक विकास कामांचे उद्घाटन केलं, मात्र विधिवत वास्तू पूजा करून समाज मंदिराचे उद्घाटन करण्याचा हा अनोखा कार्यक्रम केवळ गावाच्या विकासाची जाण आणि गावकऱ्यांचा एकोपा असेल तर, असा सुंदर सोहळा होऊ शकतो” असे गौरोद्गार काढत समाज मंदिरासाठी मुख्य रस्त्यालगत जागा दिल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांनी गावकऱ्यांचे कौतुक केलं.

कुडे सातवी पाडा येथे सार्वजनिक – सांस्कृतिक कार्यासाठी गावाच्या मालकीची जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावात सार्वजानिक गणेशोत्सवासारखे सण जिल्हा परिषदेच्या शाळेत साजरा करावे लागतं होते. यामुळे शाळेतील मुलांची गैरसोय होत होती. शिवाय शाळेतील सामानाचे आणि परिसराचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामूळे समाज मंदिराची नवी वास्तू गावासाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि गावासाठी इतर महत्त्वाचे, विकासात्मक कार्यक्रम घेण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचे मत व्यक्त करत, आमदार राजेश पाटील यांनी गावाची अडचण लक्षात घेऊन तात्काळ समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावातील सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे मा. खजिनदार संतोष सातवी यांनी आभार व्यक्त केले. तसेच, यावेळी समाज मंदिरासाठी जागा देणारे दामोदर शिवा सातवी आणि प्रवीण वसंत सातवी यांचा सत्कार करण्यात आला.

समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन सांबरे, कुडे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विलास पाटील, कुडे गावचे पोलीस पाटील तुषार सातवी तसेच, ग्रुप ग्रामपंचायत दहिसर -कुडे – गुंदावेच्या सरपंच सौ. अंकिता भोईर, उपसरपंच साजिद शेख, माजी सरपंच दशरथ जाधव, सदस्य उल्हास ठाकूर, अन्वी सातवी, महालक्ष्मी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे मा. अध्यक्ष अनिल सातवी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुणवर्ग आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.