लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली:- जिल्ह्यात खनिज उत्खनन करणा-या कंपनीच्या जड वाहनांची संख्या व दुचाकी – चारचाकी वाहनांच्या खरेदीदारांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असून जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग शहराच्या व गावाच्या मध्यवर्ती भागातून गेलेले आहेत त्यामूळे जड वाहतूक करणारे वाहन धारकांना व शहरातील वाहन धारकांना एकाच महामार्गाचा उपयोग करावे लागत असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावीत होऊन दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे त्यामूळे यावर आळा घालण्यासाठी शहर व गावातून वाहनांच्या वेगाची गती तासी २० किमी करण्यात यावी व महामार्ग पोलिसांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाने केली आहे.
पुढे या निवेदनात म्हटले आहे की, शहर व गावातून तासी २० किमी वेगाची मर्यादा करण्यात यावी व यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, महामार्गावरील अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी महामार्ग पोलिसांची संख्या वाढवून त्यांची गस्त वाढविण्यात यावी व महामार्ग पोलिसांना अत्याधूनिक यंत्र सामुग्री पुरविण्यात यावी, जड वाहतुक करणा-या वाहनांची वर्दळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यातील प्रमुख शहरामध्ये रिंग रोडची निर्मीती करण्यात यावी आदि मागण्या सुद्धा निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ कमेटीचे संयोजक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळात वंचितचे जेष्ठ नेते जी. के. बारसिंगे, जेष्ठ नेते विलास केळझरकर, युवक आघाडीचे उपाध्यक्ष कवडू दुधे, शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, शहर संगठक भारत रायपूरे, संदिप सहारे आदिंचा समावेश होता.