जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पटसंख्या वाढवा

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर – “शाळांतील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावून, पालकांचा विश्वास संपादन करा आणि जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचा संकल्प करा,” असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

“इंग्रजी शाळांचे वाढते आकर्षण असले तरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य देण्याची ताकद आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून अध्यापन पद्धतीत नाविन्य आणावे आणि गुणवत्ता वाढवावी,” असेही ते म्हणाले. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. अशोक कटारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिक्षणात गुणवत्ता आणि विश्वास निर्माण करण्यावर भर जि.प. शाळांतील पटसंख्या का घटते आहे, याचे कारण शोधा आणि उपाययोजना राबवा. शाळांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक समिती, शिक्षकांकडूनच पडताळणी, नवीन संशोधन, अशा उपायांवर भर. दर पंधरा दिवसांनी चावडी वाचन उपक्रम राबवण्याचे निर्देश.

विद्यार्थ्यांचे शाळेतील स्वागत अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचे नियोजन आतापासूनच करा. इंटरनेट व वीज पुरवठा अडचणी असलेल्या शाळांना जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी.

शाळांना भेटी आणि तक्रारींवर लक्ष देण्याचे निर्देश..

पालकमंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना गाव पातळीवर शाळांना भेटी देण्याचे निर्देश दिले. शाळांतील सीसीटीव्ही खरेच कार्यरत आहेत का, तक्रार पेट्यांचा वापर होतो का, याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले.

मानव विकास योजनेतून विद्यार्थिनींना सायकल वाटप..

शासनाच्या मानव विकास योजनेतून 7445 विद्यार्थिनींना सायकली वाटण्यात आल्या असून जिल्ह्यात 2461 शाळा कार्यरत आहेत. यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या असून एकूण विद्यार्थी संख्या 3 लाख 61 हजार 687 इतकी आहे. 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली असून उर्वरित 549 शाळांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.