देशाची कोरोना रुग्णांची संख्या ७८ लाखांच्या पार .

नवी दिल्ली | गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ५०,१२९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७८,६४,८११ वर पोहचली आहे.

देशात ६,६८,१५४ एक्टिव्ह केसेस आहेत,तर डिस्चार्ज मिळालेले ७०,७८,१२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १,१८,५३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

दरम्यान, २४ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,२५,२३,४६९ नमूने तपासण्यात आले आहेत. तर, यातील ११ लाख ४० हजार ९०५ नमून्यांची काल तपासणी झाली आहे.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जगभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही परिस्थितीला गांभीर्याने घेतलं जाताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. काही देशांमध्ये निष्काळजीपणामुळे कोरोनाची भयानक परिस्थितीत निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी भयानक होण्याची शक्यता आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे (WHO warns world on Corona pandemic).

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहॉलम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण जगाला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्त सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. कोरोना संकटामुळे संपूर्ण जग, विशेषत: उत्तर गोलार्ध गंभीर टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अनेक देशात कोरोना प्रचंड फोफावत आहे. त्यामुळे पुढचे काही महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं टेड्रोस म्हणाले आहेत.