लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १५ फेब्रुवारी: अवैध दारूविक्री सुरु असलेल्या चामोर्शी तालुक्यातील गांधीनगर गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गावसंघटनेने पुढाकार घेतला असून गावातील जवळपास २५ दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले आहे.
गांधीनगर गावात दोन वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, गावातील जुनी गाव संघटना निष्क्रिय झाल्याची संधी साधून एकाला बघून विक्रेत्यांनी दारूविक्री सुरु केली. त्यामुळे शेजारी गावातील मद्यपीही या गावात गर्दी करीत असत. अशातच १३ फेब्रुवारी २०२३ रोजी गावातील बैठकीमध्ये गावकऱ्यांच्या मदतीने नवीन गाव संघटना गठीत करण्यात आली. तसेच दारूविक्री थांबविण्यासाठी गावातील विक्रेत्यांशी चर्चा केली, व विक्रेत्यांकडून अवैध व्यवसाय बंद करण्याची हमी घेण्यात आली.
या बैठकीमध्ये गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी विविध ठराव घेण्यात आले. दारूविक्रेत्यानी ताबडतोब अवैध दारू नष्ट करावी, दारू विक्रेत्यांनी मुजोरीने दारूविक्री सुरु केल्यास दंड व गावसभे द्वारा तडीपार करण्यात येईल या ठरावांचा समावेश आहे. दारूबंदी करिता कायदा व दारूचे दुष्परिणाम, दारू वाईट आहे का चांगली याबाबत मुक्तिपथ उपसंघटक आनंद सिडाम यांनी मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दुसऱ्या दिवशी गाव संघटनेने २५ विक्रेत्यांना दारूबंदीसाठी रीतसर नोटीस दिले. नवीन गाव संघटनेच्या पुढाकारामुळे गांधीनगर गावाची दारूमुक्त गाव निर्माण करण्याकडे वाटचाल सुरु आहे.
बैठकीला प्रेमीला वेलादी, उपसरपंच सुगाबाई आत्राम, पोलिस पाटील सिडाम, माजी सरपंच विलास चौधरी, वसंत आत्राम, निर्मला कुळमेथे, विनाबाई सिडाम, शीतल माळादे, कुसुम सिडाम, नीता कन्नाके, वच्छलाबाई बोदरे, रत्नमाला वेलादी, कविता राजू सिंग, आशा गेडाम, कल्पना मांडवगडे, पुष्पा कन्नाके, शालंदा कन्नाके, रिता कुळमेथे, शब्बीताई उरेते, चंद्रकला आत्राम, विजया गेडाम, स्पार्कचे प्रियंका भुरले व सोनी सहारे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा!: नाना पटोले
राज्यभरात दिव्यांगांचे सर्वेक्षण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे