महाराष्ट्रातील भूमीपुत्रांवर अन्याय, प्रकल्प महाराष्ट्रात आणि नोकरीच्या मुलाखती चेन्नईत

वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या सिव्हिल इंजिनिअर्ससाठीची नोकर भरती चेन्नईत - आदित्य ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 20 सप्टेंबर :-  वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून आलेल्या या सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सेनाभवनमध्ये पत्रकार परिषद घेत वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या सिव्हिल इंजिनिअर्ससाठीची नोकर भरतीसाठीचा मुद्दा उपस्थित करत धक्कादायक खुलासा केला. वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम सुरू आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन रिव्ह्यू केलं की नाही माहीत नाही. वर्सोवा-बांद्रा प्रकल्प दुसऱ्या कंत्राटदारकडे दिला आहे. या कंपनीचं नाव घेत नाही कारण ते वेदांता वर जसा दबाव आणून ट्विट करायला लावलं तसं लावतील. या कंपनीने नोकरी मुलाखतीसाठी वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवला आहे. या कामासाठी इंटरव्ह्यू कुठे ठेवलेत चेन्नईसाठी; महाराष्ट्राच्या मुलांसाठी महाराष्ट्रात कुठेच इंटरव्ह्यू नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सगळं मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने चाललं आहे. नसेल तर मुख्यमंत्र्यांचा धाक नाही आहे. रोज राजकीय प्रवेश सुरू आहेत; ते करा पण महाराष्ट्रात रोजगार येणार कधी? प्रकल्प महाराष्ट्रात आणि नोकरीसाठी मुलाखती होताहेत चेन्नईला यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांच्या सहकार्याने हे होत आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं, महाराष्ट्रात चांगले इंजिनिअर्स आहेत, भूमिपुत्र आहेत त्यांना संधी का नाही, फक्त चेन्नईत इंटरव्ह्यू का? भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

हे देखील वाचा :-