लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ११ नोव्हेंबर :
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन व नवोपक्रमांना चालना देण्यासाठी ‘इन्स्पायर्ड अवॉर्ड–मॅनक विज्ञान प्रदर्शनी २०२३-२४ व २०२४-२५’चे जिल्हास्तरीय आयोजन १७ व १८ नोव्हेंबरला गडचिरोलीत करण्यात आले आहे. हे प्रदर्शन अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा, गोंडवाना सैनिकी विद्यालयाजवळ, नवेगाव-चामोर्शी रोड येथे होणार आहे.
या प्रदर्शनीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २२३ विद्यार्थी त्यांच्या वैज्ञानिक प्रतिकृतींसह सहभागी होणार असून, गडचिरोलीतील ४३ व चंद्रपूरमधील १८० विद्यार्थी यात आहेत. कोविडनंतर पहिल्यांदाच दोन्ही जिल्ह्यांसाठी संयुक्त आयोजन करण्यात आले आहे.
या तयारीचा आढावा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील समस्यांवर उपाय शोधण्याची संधी या उपक्रमातून मिळते.
१५ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता ‘विज्ञानदिंडी’ धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालयापासून निघून जिल्हा परिषद हायस्कूल, चामोर्शी रोड येथे समारोप होईल. १७ नोव्हेंबरला उद्घाटन व १८ नोव्हेंबरला पारितोषिक वितरण होणार असून, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भुसे यांनी सर्व शाळांना विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाला आणून विज्ञानाविषयीची जिज्ञासा वाढवण्याचे आवाहन केले आहे. पुढील नियोजन बैठक १३ नोव्हेंबरला होणार आहे.