लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आष्टी: परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आष्टी जवळील एका गावात बस स्थानकावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली.
याच वेळी, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते हे आलापल्ली येथे महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असताना, आष्टी येथे बौद्ध समाज बांधवांचा जमाव निदर्शन करत असल्याचे पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला व या संतप्त नागरिकांची व्यथा जाणून घेतली.
घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर मा.खा. अशोकजी नेते यांनी ठाणेदारांना तात्काळ सूचना दिल्या की, या कृत्यामागील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित आरोपीला तत्काळ अटक करावी. यावेळी मा.खा. अशोकजी नेते यांनी जय भीमचा नारा देत बाबासाहेबांचा जयजयकार केला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे उपस्थित बौद्ध बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,माजी जि.प.सदस्य धर्मप्रकाश कुकडकर, ठाणेदार, पोलीस अधिकारी तसेच मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव, नागरिक आणि भगिनी उपस्थित होत्या.
“परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही. बाबासाहेबांच्या विचारांवरच नवभारताचे भवितव्य उभे आहे, त्यामुळे समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा आम्ही कडाडून विरोध करू!” असा ठाम निर्धार मा.खा. अशोकजी नेते यांनी व्यक्त केला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.