निवी गावाचा अपमान की नियोजनातील दुर्लक्ष? ग्रामपंचायत विभाजनाच्या राजकारणात ‘निवी’ गाव डावलले, ग्रामस्थ संतप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रोहा : वरसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत एक गंभीर वळण घेतले. ग्रामपंचायत विभाजनाच्या चर्चेत निवी, ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी या गावांना सामावून न घेता वरसे आणि भुवनेश्वर गावांपुरतेच निर्णय मर्यादित ठेवण्यात आले, ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामसभेत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.

ग्रामस्थांनी या कृतीला “निवी गावाचा सुनियोजित अपमान” ठरवत, ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्यांवर पक्षपाती व भेदभावपूर्ण वर्तनाचे आरोप केले. “आमच्या सहभागाशिवाय होत असलेल्या या चर्चांना आम्ही वैध मानणार नाही,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

ग्रामसभा ठरली रणभूमी…

ग्रामसभेमध्ये आरंभी साधारण अजेंडावर चर्चा सुरू असताना, अचानक निवी गावातील एका प्रतिनिधीने आवाज उठवत विचारले, “आमच्या गावाचे नाव कुठे आहे?” — आणि तेव्हाच सभागृहात खळबळ माजली. काही ग्रामपंचायत सदस्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषय टाळायचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी या ढिसाळपणाचा तीव्र निषेध केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवक व सरपंच यांनी या संपूर्ण प्रक्रियेत निवी गावाची भूमिका आणि गरज विचारातच घेतली नाही. आदिवासी वस्ती असलेल्या ठाकूरवाडी व आदिवासीवाडी यांचं तर नावसुद्धा चर्चेत घेतलं गेलं नाही.

राजकीय फायद्यासाठी गावांची फूट?..

ग्रामस्थांनी असा ठपका ठेवला आहे की, काही ग्रामपंचायत सदस्य भुवनेश्वर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून निर्माण करण्यासाठी दबाव आणत आहेत, पण निवीचा उल्लेख टाळून त्यांनी स्वार्थ आणि राजकीय हितसंबंध पुढे ठेवले.

“ग्रामपंचायतीत आम्हालाही मताधिकार आहे, पण आज जे झालं ते आम्हाला नागवणं आहे. ही घटना केवळ अपमानकारकच नाही, तर आमच्या विकासाच्या मार्गात अडथळा आणणारी आहे,” असे एका महिला ग्रामस्थाने स्पष्टपणे सांगितले.

तणावाच्या छायेत भविष्यातील ग्रामसभा..

ग्रामस्थांनी आजच्या घटनेनंतर येत्या काळात ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय मान्य न करण्याचा इशारा दिला आहे. “जोपर्यंत प्रशासन माफी मागत नाही, आणि आमच्या गावाचा समावेश करून पुन्हा प्रक्रिया राबवत नाही, तोपर्यंत ग्रामसभा घेऊ दिली जाणार नाही,” असा एकमताने ठराव पारित करण्यात आला.

संपूर्ण गावात संतप्त वातावरण असून, ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंचांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे प्रशासन आणि ग्रामपंचायतीची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणावर डागाळली आहे.

प्रशासन गप्प, पण प्रश्न मोठा..

या प्रकरणात अद्याप तालुका प्रशासनाची कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. तथापि, जर निवी ग्रामस्थांनी ठरवल्याप्रमाणे पुढील ग्रामसभा रोखली, तर संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा वाद केवळ स्थानिक पातळीवर न राहता, गटातील इतर उपेक्षित गावांसाठीही चेतावणी ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय्य तोडगा काढावा, अन्यथा हा आक्रोश आंदोलनात रूपांतरित होऊ शकतो, असा सूर वाढू लागला आहे.