लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, १६ जून : “भारतीय संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय ही मूल्यं केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष आयुष्यात उतरली, तर खऱ्या अर्थानं आदर्श समाज उभा राहू शकतो,” असं स्पष्ट मत रामदास कोंडागोर्ला गुरुजी यांनी व्यक्त केलं. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर या अतिदुर्गम गावात संविधान जनजागृती व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अतिदुर्गम झिंगानूरमध्ये संविधानाचा दीप प्रज्वलित..
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात परिसरातील विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. विद्यार्थ्यांना संविधान अभ्यासासाठी डायरी व पेन वाटप करून संविधानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले.
समाज परिवर्तनाची दिशा संविधानात..
रामदास कोंडागोर्ला गुरुजी यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, डॉ. आंबेडकरांचे योगदान, आणि आजच्या सामाजिक वास्तवाशी संविधानाचे नाते यावर सखोल विवेचन केले. “संविधान ही केवळ शासकीय कागदपत्रे नाहीत, ती जनतेच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जिवंत संहिता आहे. युवकांनी ती समजून घेतली, तर समाजात परिवर्तन अपरिहार्य ठरेल,” असे ते म्हणाले.
सुमितचा यशस्वी प्रवास ठरतो प्रेरणादायी..
कार्यक्रमात झिंगानूरमधील सुमित प्रभाकर कुमरी या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. वांगेपल्ली समाजकल्याण निवासी शाळेत शिकणाऱ्या सुमितने दहावी परीक्षेत ९१.९४% गुण मिळवत समाजकल्याण नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला.त्याचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.सुमितने पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन आदिवासी व उपेक्षित समाजासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचे स्वप्न आणि आत्मविश्वास उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव कुमरी होते.प्रमुख अतिथी म्हणून बाबुराव कुमरी, पत्रकार रामचंद्र कुमरी, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव कोंडागोर्ला, तसेच पालक प्रतिनिधी सुरेश पागे आदींची उपस्थिती होती. संचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षक रामण्णा कोंडागोर्ला यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शाळा समितीने विशेष मेहनत घेतली.
दुर्गम भागातून संविधानाच्या जागृतीची नवी चळवळ..
हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, एक संविधान साक्षरता चळवळ म्हणून उभा राहतो आहे.झिंगानूरसारख्या दुर्गम गावात संविधानावर संवाद घडवणं ही समाजासाठी नव्हे तर लोकशाहीसाठीही एक आशेची किरण ठरते. विद्यार्थ्यांच्या मनात मूल्यांची बीजं पेरणारा हा उपक्रम हीच संविधानाला खरी मानवंदना!