अजित पवारांची नॉट रिचेबल होण्याची वेळ आली; निलेश राणेंकडून राजकीय भूकंपाचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ४ फेब्रुवारी: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महाविकास आघाडीतही खात्यांची अदलाबदल होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याकडे असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाशिवाय आणखी एका पदाची निर्मिती करण्याचा विचार सुरु आहे. हे उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने फासे टाकायलाही सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘अजित पवारांच्या नॉट रिचेबल होण्याची वेळ आली’, असे सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत. पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. याचा अर्थ अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असे निलेश राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात होऊ शकतात उपमुख्यमंत्री?; अजित पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद मिळणार, या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी मिळून महाविकास आघाडीला मूर्तरूप आणलं आहे. त्यांनी जे निर्णय घेतलेत ते पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल होत असतील तर त्यात बाकी कुणी पडण्याचे कारण नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

ajit pawarBalasaheb ThoratNana PatoleNilesh Rane