जांभळी, नवेगाव जंगलपरिसरात दारूविक्रेत्यांचा हजारोंचा मुद्देमाल नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : धानोरा व गडचिरोली तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जांभळी व नवेगाव जंगलपरिसरात अहिंसक कृती करीत २१ ड्रम मोहफुलाचा सडवा व १५ लिटर दारू नष्ट करण्यात आली. हि कृती गाव संघटनेच्या मदतीने गडचिरोली व धानोरा मुक्तिपथ तालुका चमूने केली.
जांभळी व नवेगाव येथील दारूविक्रेते सीमावर्ती भागातील जंगलपरिसराचा आधार घेत हातभट्टी लावून दारू गाळतात. या विक्रेत्यांच्या माध्यमातून तालुका मुख्यालयासह जवळपासच्या किरकोळ दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. संबंधित गावातील विक्रेत्यांविरोधात वारंवार अहिंसक कृती, पोलिस विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. यामुळे आसपासच्या गावातील महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच जंगलपरिसरात विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे मुक्तिपथ तालुका चमूने जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून जवळपास २१ ड्रम मोहफुलाचा सडवा व १५ लिटर दारू नष्ट केल्याची कारवाई केली. या कारवाईमुळे विक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात यश आले आहे.