पत्रकारांना कोरोनाची लस मोफत मिळावी – शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. 06 जानेवारी: कोरोनामुळे उद्भवलेल्या टाळे बंदीच्या काळात सर्वसामान्य जनता घरात बसलेली असताना पोलिस, आरोग्य यंत्रणेसोबत आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक घटना, घडामोडी, शासनाच्या उपाय योजनांची इत्तंबूत माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांनी मोलाचे योगदान दिले असून, खरे कोरोना योध्दे  असलेल्या पत्रकारांना कोरोनाची लस मोफत मिळावी. अशी अपेक्षा शिवसेना नेते, माजी मंत्री, तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केली.

               केंद्र शासन हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. अगोदर सांगत होते की आम्ही सर्व देशामध्ये कोरोनाची लस मोफत देऊ. ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्याठिकाणी छातीठोकपणे त्यांनी सांगितलं की आम्ही मोफत लस देणार. पण अलीकडच्या काळात जे स्टेटमेंट्स येऊ लागले त्यातून असं वाटत नाहज की लस ही मोफत दिली जाईल. आणि ते काही स्पष्टपणे सांगायला तयार नाही या शब्दात शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी केंद्र शासनावर तोफ डागली. दरम्यान बोलताना ते म्हणाले की, ‘‘मी आज दर्पण दिनाचे औचित्य साधून मा. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, अत्यावश्यक सेवेमधील सर्व कर्मचार्यांबरोबर राज्यातील सर्व पत्रकारांना ही लस प्रधान्यांनी आणि मोफत द्यावी’’ अश्या प्रकारची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गौरव सोहळा: ममता दिन व दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

दर्पण दिन आणि ममता दिनाचे औचित्य साधत आज माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पत्रकारांचा गौरव केला .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील पत्रकारितेला देशात वेगळे महत्त्व असून दुर्लक्षित, उपेक्षित असलेल्या वंचितांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्यासह सामाजिक पटलावर आणण्याचे काम पत्रकारांनी केले. असे सांगून अनुशेषातील असमतोलाबाबत जनजागृती, ज्ञानात भर व जनतेत जागृती केल्याने वैधानिक विकास महामंडळे स्थापन होण्यात प्रसारमाध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अर्जुन खोतकर यांनी नमूद केले.

वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे आपण विधानसभेत अनेक प्रश्नांवर आवाज उठविल्याचे सांगत सार्वजनिक जीवनात वावरताना पत्रकारांची नेहमीच मौलिक साथ लाभली .आमच्या लहानशा कामांचे जनतेसमोर कौतुक केले .असेही अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.