लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली या आदिवासी गावाने आपल्या पहिल्या आणि एकमेव वीज अभियंत्याला काळाच्या निर्दयी झटक्यात गमावले. महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले दलसू कटिया नरोटे (वय ३७) हे रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त पत्नी व दोन चिमुकल्या मुलांसह आपल्या गावी आले होते. काही दिवसांच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या या कुटुंबावर शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी दुःखाचा डोंगर कोसळला.
दलसू नरोटे हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे कार्यरत होते. सुटीत ते प्रथम पत्नीच्या माहेरी पुल्लिगुडम (ता. मुलचेरा) येथे गेले. दुसऱ्या दिवशी शेतातील रोवणीचे काम पाहण्यासाठी ते शेताकडे गेले.शेतालगत असलेल्या नाल्या जवळ ते गेले असताना त्यांना अचानक मिर्गीचा झटका आला आणि ते पाण्यात पडले. बराच वेळ ते परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला असता, ते नाल्यात बुडालेल्या अवस्थेत आढळले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना दुचाकीवरून गावात आणून, नंतर खाजगी वाहनाने एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करण्यात येणार असून, या घटनेने संपूर्ण कारमपल्ली गाव आणि महावितरण परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. २०१४ साली महावितरण मध्ये अभियंता म्हणून रुजू झालेल्या दलसू नरोटे यांनी गडचिरोली, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यांत सेवा बजावली होती. एटापल्ली तालुक्यातील पहिला वीज अभियंता हा किताब त्यांच्याच नावावर होता. त्यांच्या जाण्याने दोन चिमुकल्या मुलांचे सावली समान वडील कायमचे हिरावले गेले, तर गावाने आपला अभिमान गमावला आहे.