खेलाे इंडिया युथ गेम्स: मुष्टीयुध्दामध्ये सोनेरी हॅट्ट्रिकसह महाराष्ट्राचा पदकांचा षटकार

तीन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

भोपाळ 4 फेब्रुवारी :- कुणाल घोरपडे, उमर अन्वर शेख, देविका घोरपडे यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने मुष्टीयुद्धाच्या शेवटच्या दिवशी चार पदकांची कमाई करीत या खेळातील पदकांचा षटकार पूर्ण केला. महाराष्ट्राच्या उस्मान अन्सारी याला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले.

पुण्याची जागतिक युवा सुवर्णपदक विजेती खेळाडू देविका हिने ५२ किलो गटाच्या अंतिम फेरीत मध्य प्रदेश काफीकुमारी हिचा सहज पराभव केला. या लढतीच्या वेळी मध्य प्रदेशच्या खेळाडूला प्रेक्षकांचा सातत्याने पाठिंबा मिळत होता. ते ओरडून देविकाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु देविका हिने शांतपणे ही लढत खेळली आणि विजयश्री संपादन केली. ही लढत जिंकण्याचे मनोधैर्य देविका हिने उपांत्य फेरी जिंकल्यानंतरच व्यक्त केले होते.

मुलांच्या ४८ किलो गटात उमर शेख याने पंजाबच्या गोपी कुमार याचा दणदणीत पराभव केला. आक्रमक ठोसेबाजी व भक्कम बचाव असा दुहेरी तंत्राचा उपयोग करीत त्याने गोपी याला निष्प्रभ केले. ७१ किलो गटात कुणाल याच्यापुढे हरियाणाच्या साहिल चौहान याचे कडवे आव्हान होते. तथापि कुणाल याने सुरुवातीपासूनच कल्पकतेने ठोसेबाजी केली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला रोखून धरले. उमर, कुणाल, देविका व कांस्यपदक विजेती वैष्णवी वाघमारे हे पुण्याचे चारही खेळाडू ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या अकादमीचे खेळाडू आहेत.‌ मुलांच्या ५१ किलो गटात उस्मान अन्सारी या मुंबईच्या खेळाडूला मणिपूरच्या एम जादूमनी सिंग यांच्याविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. उस्मान याने शेवटपर्यंत चांगली लढत दिली.‌

‘सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास होता’
या स्पर्धेमध्ये चिवट आव्हान असले तरी जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकण्याची आम्हाला खात्री होती असे देविका, कुणाल व उमर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,” आमच्या प्रतिस्पर्ध्यांना चाहत्यांकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत होते तरीही आम्ही शेवटपर्यंत संयम ठेवल्यामुळे ही सोनेरी कामगिरी करू शकलो. आमच्या या यशामध्ये राज्याचे क्रीडा संचालनालय, आमचे प्रशिक्षक व पालक यांनी दिलेल्या सहकार्याचा मोठा वाटा आहे.” महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंना विजय दुबाळे व सनी गेहलावत यांचे मार्गदर्शन मिळाले होते.

हे पण वाचा :-