लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
कुरखेडा : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी अधिकारी मागील ३ महिन्यांपासून कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याने येथील कारभार वाऱ्यावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांचे, तसेच जमिनीच्या कामासंदर्भात येणाऱ्या नागरिकांची कामे रखडत आहेत.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देत येथील व्यवस्था सुरू करावी अन्यथा विभागाच्या या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. उमेश वालदे यानी पत्रकाद्वारे दिला आहे.
शहरवासीय व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून नुकतीच येथील भूमी अभिलेख कार्यालयाला अॅड. उमेश वालदे यानी भेट देत येथील कार्यालयीन व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. यावेळी मोठे विदारक चित्र येथे आढळून आले. येथे मस्टरवर १५ पदे भरण्यात आलेली आहेत, मात्र प्रत्यक्षात मोजकेच कर्मचारी येथे कार्यरत आढळून आले. येथे कार्यालयीन प्रमुख म्हणून पदस्थ प्रभारी उप अधीक्षक योगेश कांबळे यांची मूळ आस्थापना जिल्हा कार्यालय गडचिरोली असल्याने ते मागील ३ महिन्यांपासून कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची माहिती मिळाली. तसेच, २ कर्मचारी दिर्घ वैद्यकीय रजेवर, २ प्रतिनियुक्तीवर, २ प्रशिक्षणावर व एक कर्मचारी दौऱ्यावर राहत असल्याचे आढळून आले.
भूमी अभिलेख कार्यालयाचे बहुतांश कामे ही आनलाइन संगणीकृत असते, मात्र येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या टेबलावर संगणक तर होता, मात्र त्यांना लॅपटॉप पुरविण्यात आलेला नाही, अशी माहिती मिळाल्याने येथील संगणक हे फक्त शोभेची वस्तू ठरलेले आहेत. येथील कामकाज ऑफलाइनच सुरू आहे.