लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई / कोल्हापूर : नांदणी मठाच्या अंगणात ३४ वर्षांपासून गजराजासम मान मिळवणाऱ्या हत्तीणी माधुरी ऊर्फ महादेवी ला पुन्हा तिच्या मठात परत आणण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुढाकार घेतल्याने, महाराष्ट्रात हत्तीप्रेमींसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करणार असून, या संपूर्ण लढ्याला शासकीय पाठबळ लाभणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीत दिली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार राजू शेट्टी, नांदणी मठाचे पूज्य जिनसेन महास्वामीजी व अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “ही जनभावना आहे, श्रद्धा आहे… ३४ वर्षांपासून मठात असलेली माधुरी हत्तीण पुन्हा त्या भूमीत यावी, यासाठी राज्य शासन तिच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण कायदेशीर बाजू मांडणार आहे. हत्तीणीची योग्य निगा राखण्यासाठी शासनाचे पथक तयार करण्यात येईल. आवश्यक असेल तर ‘रेस्क्यू सेंटर’ सारखी देखील सुविधा उभारण्यात येईल.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, नांदणी मठाची याचिका आणि राज्य शासनाची स्वतंत्र याचिका, दोन्हींतून सामंजस्याने काम होईल. तसेच याप्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असंही त्यांनी जाहीर केलं.
या मुद्द्यावर खासदार-आमदारांसह अनेक सामाजिक संघटनांनी राज्य शासनाला पाठिंबा देत “माधुरी ही श्रद्धेचा भाग आहे, न्याय द्यायलाच हवा”, अशी एकमुखी भावना व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यातील अन्य हत्तींची माहिती गोळा करून धोरणात्मक निर्णय घेण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या.