कोरची – कुरखेडा मार्गाच्या खड्यांवर मत्स्यपालनाची परवानगी द्या: बेरोजगारांची प्रशासनाला मागणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

कोरची, दि. ३ ऑक्टोंबर: कोरची मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर कोरची कुरखेडा मार्गावर अंदाजे 6 किलोमीटर अंतराचे वळणी घाट असून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. जड व हलक्या वाहनांची या मार्गाने ये-जा होत असताना रस्त्यावर निर्माण झालेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे खड्डे चुकवण्याच्या नादात नेहमी अपघात होत असून सदर मार्ग हे अपघात प्रवण स्थळ बनले आहे. या मार्गाची दयनीय अवस्था पाहून हे मार्ग  खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

काही महिन्या पूर्वी सदर मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागा कडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांत पाणी भरून असल्यावर खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना समजून येत नसल्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झालेली असून सदर मार्गावर बहुतेक लोकांनी अपघातांमुळे आपला जीव सुद्धा गमाविला आहे. त्यामुळे संबंधित अभियंता वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

या मार्गावर वळणी घाट असल्यामुळे समोर असलेला खड्डा वाहनचालकांना दिसून येत नाही व वळणावर वेळीच मोठ मोठे खड्डे दिसून येत असल्यामुळे चालकांचा तोल बिघडून अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्ग त्वरीत व्यवस्थितपणे दुरुस्त करून देण्यात यावे याकरिता कित्येकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी गाढ झोपेत असल्यामुळे रस्त्याची आज ही अशी अवस्था झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोरोना महामारीत कित्येक लोकांचे रोजगार गेले असून यामुळे बहुतेक बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. अशात या मार्गात निर्माण झालेल्या खड्ड्यांचे रूपांतर तलावात झाल्यामुळे निदान आम्हा बेरोजगारांना या तलाव रुपी खड्ड्यांमध्ये मत्स्यपालनाची परवानगी तरी देण्यात यावी अशी मागणी कोरची परिसरातील बेरोजगार युवक करीत असल्याची चर्चा शुरू आहे.