कोरची नगरपंचायतला स्थायी मुख्याधिकारीच नाही, नऊ वर्षांपासून प्रशासन वाऱ्यावर — स्थानिक तहसीलदारांकडे कारभार देण्याची नागरिकांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : २०१५ साली नगरपंचायत दर्जा प्राप्त झालेल्या कोरचीला आज नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेला नाही ही बाब गंभीर असून, सध्या पुन्हा एकदा कोरची नगरपंचायत विना मुख्याधिकारी वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. आशिष चव्हाण यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ वगळता कोरचीचा कारभार कधी वडसा, कधी आरमोरी तर कधी कुरखेडा येथील अधिकाऱ्यांकडे देण्यात आला असून सध्या प्रभार असलेल्या पंकज गावंडे यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात झाल्याने कोरची नगरपंचायतीचा कारभार पुन्हा ठप्प झाला आहे. यामुळे नगरातील नियमित कामकाजासह विकास योजनांचा गतीला मोठा ब्रेक लागला आहे.

याआधीही प्रभाराधीन अधिकाऱ्यांनी कोरचीच्या गरजा आणि समस्या न समजून घेताच राबवलेल्या योजनांमुळे विकासाऐवजी अडचणी वाढल्या असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. सध्या पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर असूनही शहरात नाल्यांची सफाई झाली नसल्याने आरोग्यधोक्याची स्थिती निर्माण झाली आहे, मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून नागरिकांचा रोजचा प्रवास जिवावर येतो आहे, अपघातांची मालिका सुरू आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा अपूर्ण असून नागरिकांना केवळ टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे, तर विजेचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

या सगळ्या असुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगरपंचायतीकडून घरपट्टी व इतर करांची वसुली सक्तीने केली जात असून त्याच्या मोबदल्यात कोणतीही सुविधा नागरिकांना मिळत नाही हे विदारक वास्तव आहे. सध्या प्रभारी अधिकाऱ्यांना कोरचीतील कोणता वॉर्ड कुठे आहे, कोणत्या भागात काय समस्या आहेत याची मूलभूत माहितीच नाही, यामुळे योजनांचे नियोजनच अपुऱ्या माहितीवर आधारित असून निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायतीत होणाऱ्या बांधकामांची गुणवत्ता न तपासता तातडीने मंजुरी दिली जाते, यामागे भ्रष्ट कारभाराचे स्पष्ट संकेत आहेत, इतकेच नव्हे तर प्रभारी अधिकारी कोरचीमध्ये स्थायिक नसल्याने नगरपंचायतीचे कर्मचारी त्यांच्या राहत्या गावी जाऊन सह्या घेत आहेत आणि कार्यालयाचा कारभार फिरती स्वरूपाचा झाला आहे.

यामुळे नागरिकांना तातडीची कागदपत्रे अथवा सेवा मिळवण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, नगरपंचायतीतील सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी कोरचीच्या विकासासाठी कोणताही ठोस पाठपुरावा केलेला नाही, त्यांच्या दुर्लक्षामुळे कारभार अधिकच ठप्प झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर कोरची नगरपंचायतचा प्रभार वडसा, आरमोरी किंवा कुरखेडा येथील मुख्याधिकाऱ्यांकडे न देता कोरचीतील स्थानिक तहसीलदारांकडे द्यावा, जेणेकरून रोजच्या कामकाजात दिरंगाई होणार नाही आणि गरजांच्या अनुषंगाने निर्णय घेता येतील, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे कोरचीसाठी एक स्वतंत्र, जबाबदार, पूर्णवेळ आणि स्थायीत्व असलेला मुख्याधिकारी तात्काळ नियुक्त करावा अशी ठोस अपेक्षा व्यक्त होत आहे.