लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ११ : धानोरा तालुक्यातील मौजा कुथेगाव येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे संस्थापक, देवमाणूस फादर हर्मन बाकर यांच्या १०१ व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने श्रद्धांजली स्वरूपाचा श्रमदान दिवस आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गावातून जल-जंगल-जमीन या नाऱ्यांसह मशाल फेरी काढून झाली. पुरुष व महिला नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन प्रभात फेरीत आपले योगदान नोंदवले. गावापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात श्रमदानाच्या ठिकाणी पोहोचताच, प्रमुख गाव पाटील, सरपंच, वॉटरशेड ट्रस्टचे कर्मचारी व गावकऱ्यांनी भगवान बिरसा मुंडा आणि फादर बाकर यांच्या प्रतिमेस नमन करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ केला.
संस्थेचे सामाजिक अधिकारी अतुल गौरकर यांनी वॉटरशेड ट्रस्टची माहिती व बाकर बाबांचा जीवनप्रवास सविस्तर मांडला. त्यानंतर वनराई बंधारा बांधकामासाठी ४० पुरुष आणि २० महिलांनी खांद्यावर फावडे घेऊन श्रमदान सुरू केले, आणि नियोजित वेळेत काम पूर्ण केले.
कार्यक्रमात गाव पाटील, सरपंच, वॉटरशेड ट्रस्टचे कर्मचारी, पशुधन अधिकारी राकेश पाकमोडे, कृषी अधिकारी तारेंद्र ठाकरे, अभियंता षण्मुख मडावी तसेच वसुंधरा सेवक राकेश पदा, दुधराम कोवाची, सुधाकर हलामी, अनिल पदा, आकाश कुळमेथे, रैनु झुरी व सुरेश मडावी उपस्थित होते.