लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली): जिल्ह्यातील तब्बल 150 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मृत्यूनंतरच्या शेवटच्या विधीसाठी गावोगावी अद्याप नागरिकांना नदीकाठ, उघडी मैदाने किंवा खासगी शेतजमिनींचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रशासनाकडे गावठाण अथवा महसूल जमिनीतून स्मशान भूमीसाठी जागा निश्चित करण्याची जबाबदारी आहे. काही गावांमध्ये स्मशानभूमीचे शेड उभारले गेले असले तरी, अनेक ठिकाणी जागाच न मिळाल्याने नागरिकांना अंतिमसंस्कार खुल्या आभाळाखाली उरकावे लागतात. यातून वादविवादाची शक्यता निर्माण होत असल्याचेही दिसून येते.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १,६८० गावांपैकी बहुतांश गावांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. तरीदेखील सिरोंचा तालुक्यातील तब्बल ४५ गावांसह इतर तालुक्यांमधील १५० गावे या सुविधेपासून वंचित आहेत. आदिवासी समाजाचा दफनविधीचा प्रघात असला, तरी सुरक्षित आणि सन्माननीय जागा न मिळाल्याने मृत्यूनंतरची “फरफट” कायम असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त केली जाते.
पावसाळ्यात समस्या अधिक गंभीर होते. ओल्या हवामानामुळे रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीतील अडथळे आणि जागेअभावी अंतिमसंस्काराच्या वेळी मृतदेह दीर्घकाळ थांबवावा लागतो. मृतकाच्या कुटुंबियांना यातून मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो.
प्रशासकीय अनास्थेमुळे वर्षानुवर्षे हा प्रश्न डोक्यावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार-खासदार निधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी उपाययोजना पुढे सरकल्या नाहीत. त्यामुळे “शेवटचा प्रवासही सन्मानाने होऊ दे” ही मागणी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.