लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २६ जून : जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणी, जबरदस्तीच्या भू-संपादना आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात आता निर्णायक संघर्ष उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. डाव्या, प्रागतिक आणि आंबेडकरी विचारसरणीच्या विविध राजकीय पक्ष-संघटनांनी एकत्र येत ३० जून रोजी गडचिरोलीच्या गांधी चौकात तीव्र धरणे आंदोलन पुकारण्याचा ठराव केला आहे.
आरमोरी येथे नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य काॅ. डॉ. महेश कोपूलवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लोह खाणी, प्रक्रिया प्रकल्प, तसेच बळजबरी भू-संपादन यावर जोरदार चर्चा झाली.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई रामदास जराते यांनी जिल्ह्यातील मंजूर व प्रस्तावित प्रकल्पांची पारदर्शक माहिती मांडताना सांगितले की, “ही केवळ जमीन हिसकावण्याची नव्हे, तर संपूर्ण आदिवासी अस्तित्वाचा षड्यंत्रात्मक संहार आहे.” या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला.
बैठकीत पुढील कृतीसाठी एक ठोस योजना आखण्यात आली.
१)जाणीवजागृतीसाठी पत्रके व प्रसार साहित्य छापणे…
२)बाधित गावांमध्ये जनपरिषदा घेणे आणि नंतर व्यापक मोर्चे व आंदोलन उभारणे..
३)या आंदोलनाच्या संयोजनासाठी ‘जमीन बचाओ जनसंघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली आहे.
समितीच्या नेतृत्वात हे लढा पेटणार…
या समितीचे निमंत्रक म्हणून शेकापचे भाई रामदास जराते व आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड यांची निवड झाली आहे.
सदस्यपदी भाकपचे काॅ. डॉ. महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी काॅ. अमोल मारकवार, डॉ. धर्मराज सोरदे, समाजवादी पक्षाचे ईलियास खान, डोमाजी दिवटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रशांत मडावी, शेकापचे भाई शामसुंदर उराडे, रमेश चौखुंडे, आसपाचे रूषी सहारे यांचा समावेश आहे.
सल्लागार म्हणून ॲड. जगदीश मेश्राम व ॲड. सोनाली मेश्राम यांची निवड झाली आहे.
लोकशक्तीचे उभारलेले व्यासपीठ
या बैठकीस भाकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आझाद समाज पक्ष, गोंडवाना गणतंत्र पक्ष, आम आदमी पक्ष, दलित आंदोलनातील कार्यकर्ते, शेतकरी व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
नेते धर्मानंद मेश्राम, काॅ. विनोद झोडगे, राजू केळझरकर, सीमा डोंगरे, मो. शरीफ, हाजरा बेगम, महादेव कोपूलवार, पंकज टिचकूले, अमोल मोटघरे, नागसेन खोब्रागडे, हंसराज उराडे, मेघराज भोयर, सुभाष आकलवार, पुरुषोत्तम रामटेके, सतिश दुर्गमवार, संजय वाकडे, स्वाती खोब्रागडे, आशिष नेवारे आदींनी प्रखर भाषणे करत हक्कांवर होणाऱ्या आघाताचा जाहीर निषेध केला. बैठकीला विविध गावांतील बाधित शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…
विकासाच्या नावाखाली विनाशाचा घाट नको
बैठकीच्या शेवटी एकमुखाने ठराव करण्यात आला की, विकासाच्या नावाखाली आदिवासींची घरे, शेती, जंगल आणि संस्कृती उद्ध्वस्त करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पास सामूहिक विरोध केला जाईल. शासनाने जनतेच्या सहभागाशिवाय मंजूर केलेल्या योजनेविरोधात संविधानिक मार्गाने पण प्रखर संघर्ष छेडण्यात येईल.