“जात वैधतेसाठी अंतिम संधी : गडचिरोली समितीची २९ जुलै रोजी विशेष मोहीम”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या परंतु अद्याप जात वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोलीमार्फत २९ जुलै रोजी विशेष त्रुटी पूर्तता मोहीम राबविण्यात येत आहे. त्रुटीमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे निकाली काढण्याचा उद्देश या मोहिमेमागे असून, ती विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी ठरणार आहे.

अर्ज मंजुरीला त्रुटी ठरतेय अडथळा

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) व इतर आरक्षित प्रवर्गातील शेकडो विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यातील बहुतांश प्रकरणांची कार्यवाही १७ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात आली असली, तरी काही विद्यार्थ्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अद्याप प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर समितीने २९ जुलै २०२५ रोजी विशेष मोहीम आयोजित केली असून, अर्जात उर्वरित त्रुटींची पूर्तता करून वैधता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसह प्रत्यक्ष समिती कार्यालयात हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोहिमेचे ठिकाण :

🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

🔹 शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, गडचिरोली.

प्रवेश रद्दीचा धोका टाळा

गेल्या काही वर्षांत त्रुटीमुळे प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदाही जर आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयश आले, तर संबंधित विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच राहणार आहे, असा स्पष्ट इशारा समितीचे संशोधन अधिकारी व सदस्य सचिव डॉ. सचिन मडावी यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांनी ही अंतिम संधी गांभीर्याने घ्यावी, विहित तारखेला उपस्थित राहून आपले शैक्षणिक भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.