लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता तंत्रज्ञान, कौशल्य आणि औद्योगिक संधींचे नवे पर्व सुरू झाले आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांच्या पुढाकारातून गडचिरोलीत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (UIT) ची स्थापना होत असून, ही संस्था विदर्भातील तांत्रिक शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारी ठरणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाशी भागीदारीत उभारण्यात आलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आदिवासीबहुल परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण त्यांच्या दारात मिळणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात लॉयड्स मेटल्सने २५ कोटी रुपयांचे थेट योगदान दिले आहे. या प्रकल्पासंदर्भातील सामंजस्य करारावर (MoU) मे २०२५ मध्ये मुंबईतील राजभवनात स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
AICTE, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि राज्य शासनाकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर ऑगस्ट २०२५ पासून UIT मध्ये शैक्षणिक कामकाज सुरू झाले आहे. सध्या येथे
– संगणक विज्ञान अभियांत्रिकी,
– खाण अभियांत्रिकी,
– मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी
आणि
– धातुकर्म अभियांत्रिकी
या विषयांतील डिप्लोमा अभ्यासक्रम राबवले जात असून, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशात विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.
संस्था केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न ठेवता समग्र शिक्षण मॉडेल उभारण्यावर लॉयड्स मेटल्सचा भर आहे. दर्जेदार शिक्षक गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात टिकून राहावेत, यासाठी ESOPsसारख्या अभिनव सुविधा देण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे, स्थानिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण आर्थिक भार कंपनी उचलत असून, शिक्षणासोबतच संबंधित इतर खर्चही लॉयड्सकडूनच केला जात आहे.
इतकेच नव्हे, तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑन-द-जॉब ट्रेनिंगची हमी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठाशी करार करण्यात आला असून, निवडक विद्यार्थ्यांना परदेशातील इंटर्नशिपची संधीही मिळणार आहे.
UITच्या माध्यमातून उद्योगसज्ज तांत्रिक मनुष्यबळ तयार करणे, स्थानिक तरुणांना स्थलांतराविना रोजगारक्षम बनवणे आणि गडचिरोलीच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासाला गती देणे हा लॉयड्स मेटल्सचा स्पष्ट उद्देश आहे. आदिवासी भागात कौशल्यनिर्मिती, शिक्षण आणि रोजगार यांची साखळी उभारून समावेशक विकासाचा विश्वासार्ह नमुना उभा राहात असल्याचे चित्र या उपक्रमातून स्पष्ट होत आहे.