गडचिरोलीच्या जंगलात बदलते नेतृत्व: तीन उपवनसंरक्षकांची बदली, दोन महिला अधिकाऱ्यांची दमदार एन्ट्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २६ जून : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या, नक्षलग्रस्त आणि संवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात वन प्रशासनाच्या नेतृत्वात मोठा बदल घडला आहे. जिल्ह्यातील पाच पैकी तीन प्रमुख उपवनसंरक्षकांची बदली करण्यात आली असून, विशेष म्हणजे पहिल्यांदाच एकाचवेळी दोन महिला अधिकारी ‘वनाच्या रखवालदार’ म्हणून पुढे सरसावल्या आहेत.

या बदलांतर्गत गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांची बदली सावंतवाडी (जि. कोल्हापूर) येथे प्रादेशिक उपवनसंरक्षक पदावर झाली आहे, तर आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह तोलिया यांची नियुक्ती आकोट (जि. अकोला) येथे वन्यजीव विभागात झाली आहे.

दरम्यान, सिरोंचा वनविभागाच्या पुनम पाटे या बहुचर्चित महिला उपवनसंरक्षकांची बदली महाराष्ट्र जनुक कोष (विशेष कक्ष), जैवविविधता मंडळ, नागपूर येथे झाली आहे. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर, विशेषतः जनसुविधेच्या मुद्द्यांवर, स्थानिक पातळीवर टीका झाल्याने त्यांना तुलनात्मकदृष्ट्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या पदावर पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

या सर्व घडामोडींचा विशेष पैलू म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाचवेळी दोन महिला अधिकारी उपवनसंरक्षक दर्जावर नियुक्त करण्यात आल्या आहेत. यात आर्या व्ही. एस. यांची गडचिरोली प्रादेशिक उपवनसंरक्षक म्हणून तर दीपाली लक्ष्मण वनकर (तलमले) यांची आलापल्ली प्रादेशिक उपवनसंरक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासोबत एस. नवकिशोर रेड्डी यांची सिरोंचा प्रादेशिक उपवनसंरक्षक म्हणून बदली झाली आहे.

या बदलांमुळे वनविभागात एक नवा श्वास फुंकला गेला आहे. विशेषतः दिपाली तलमले आणि आर्या व्ही.एस. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र हे जैवविविधतेने समृद्ध, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त विभागांमध्ये आहे. त्यामुळे केवळ प्रशासन नाही, तर संवेदनशील नेतृत्वाची ही खरी परीक्षा ठरणार आहे.

गडचिरोलीत सुरू असलेल्या माइनिंग प्रकल्प, पर्यावरणीय मुद्दे, आदिवासींचे वनहक्क, पर्यावरण पर्यटन यासारख्या बाबींवर आता महिला नेतृत्वाची वेगळी छाप पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “वनाचा विकास हा वृक्षतोडीत नव्हे, तर वृक्षसंवर्धनात आहे,” या विचाराने समवेत काम करणाऱ्या या अधिकारी आता गडचिरोलीच्या ‘हरित भविष्या’च्या नवनिर्माणाची नांदी ठरतील.

Allpali DFODipali talmaleGadchiroli DFOgadchiroli forest departmentNew ladies forest officer