सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गोंडवाना विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि,०३: 

गोंडवाना विद्यापीठातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फुले दांपत्याची सामाजिक क्रांती आणि आजचे वास्तव’ या विषयावर हे व्याख्यान होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे असतील. प्रमुख वक्त्या म्हणून गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय, तळोदी (बाळापूर) येथील प्राध्यापिका डॉ. माधुरी कोकोडे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभारलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा आजच्या सामाजिक वास्तवाशी असलेला संदर्भ या व्याख्यानातून उलगडण्यात येणार आहे. शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित फुले दांपत्याच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच समाजातील विचारवंतांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांनी केले आहे.