लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.१५ :मुलांमधील कायदेविषयी जागरूकता वाढविणे आणि त्यांना सुरक्षित, जबाबदार नागरिकतेकडे मार्गदर्शन करणे या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्व, बालस्नेही कायदेशीर सेवा, सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, बालकांचे मूलभूत अधिकार, मादक पदार्थांचे दुष्परिणाम, शिक्षणाचा अधिकार तसेच शाळांमध्ये प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून लागू असलेल्या पॉक्सो कायदा २०१२ बाबत संवेदनशील आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन देण्यात आले.
अॅड. वाय. एन. चेके यांचे सखोल मार्गदर्शन…
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अॅड. वाय. एन. चेके, सहाय्यक न्यायरक्षक, यांनी बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना अत्यंत समजण्यासारख्या पद्धतीने दिली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या आणि मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसनाच्या कायदेशीर यंत्रणांचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला टोल फ्री क्रमांक १५१०० याची माहिती देत, कोणत्याही कायदेशीर अडचणीत हा क्रमांक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
सचिव अं. पुं. खानोरकर यांचे प्रेरक भाषण…
शिबिराच्या अध्यक्षस्थानी असलेले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अं. पुं. खानोरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मोफत कायदेशीर सेवा, बालहक्कांचे संरक्षण, तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आशा आणि डॉन (DAWN) या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली.
बालदिनानिमित्त त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा देत, “कायद्याचे ज्ञान हे सुरक्षित भविष्यातील पहिलं पाऊल आहे,” असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
शिक्षकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता….
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती अल्का पांडुरंग जुआरे, विषय शिक्षक श्री. राजेश चिलमवार, शिक्षिका श्रीमती हिरा दुंधलवार यांची उपस्थिती होती. शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती हिरा दुंधलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राजेश चिलमवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल येथील सर्व शिक्षकवृंद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.