विधान परिषद निवडणूक महाआघाडीचा भाजपला ‘जोर का झटका’ – सहापैकी चार जागांवर भाजप पिछाडीवर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ३ डिसेंबर : राज्यात सत्तापालट झाल्याचा पहिला इफेक्ट आज ३ डिसेंबर रोजीच्या विधान परिषद निवडणुकीत दिसून आला आहे. एकीकडे धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी महाविकास आघाडीची दाणादाण उडविली असताना राज्यातील एकून सहा जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. बॅलेटवर मतदान झाल्यामुळे मतमोजणीच्या २-३ फेऱ्याच झालेल्या आहेत.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले अमरीश पटेल यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात बाजी मारली. या मतदारसंघात महाआघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यावरून अनेक प्रतिक्रिया येत असताना भाजपने मात्र आघाडीला डिवचायला सुरुवात केली आहे.
ही एक जागा सोडल्यास इतर पाचपैकी चार जागांवर भाजपला महाविकास आघाडी पिछाडीवर ढकलतांना दिसत आहे. नागपूर पदविधर मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी ४ हजार ८५० मतांनी पुढे आहेत. पहिल्या फेरीत वंजारी यांना १२ हजार ६१७ तर भाजपचे संदीप जोशी यांना ७ हजार ७६७ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत एकूण २८ हजार मतांची मोजणी झाली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी ३१३१ मते घेत आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या फेरीत २३०० मते मिळाली आहेत तर भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांना फक्त ६६६ मते मिळाली आहेत.
मराठवाडा पदविधर मतदारसंघातही पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २७ हजार ८७९ मते मिळाली आहेत तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना १०९७३ मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण यांनी १६ हजार ९०६ मतांची आघाडी घेतली आहे. पुणे विभाग पदविधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड १० हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत. तिसऱ्या स्थानावर लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात असून, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार चौथ्या स्थानावर आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा अद्याप निश्चित झालेला नाही. शिक्षक मतदारसंघाचा कोटा काही वेळातच निश्चित होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी रात्री १० वाजता कोटा निश्चित होईल.