‘स्मार्ट व्हिलेजेस’ करण्यासाठी गावांकडे चला नितीन गडकरी यांनी अभाविप कार्यकर्त्यांना केले आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, 26 डिसेंबर : कृषी आणि ग्रामीण उत्‍थानाचे कार्य करणा-या मनिष कुमार यांच्‍यासारखे प्रयोग करणा-या युवकांना एकत्र करा, त्‍यांचे प्रयोग करोडो ग्रामीण जनतेपर्यत पोहोचवा, गावांमध्‍ये जाऊन व्‍यवसाय करा, गावांना ‘स्‍मार्ट व्हिलेजेस’मध्‍ये रुपांतरित करण्‍यासाठी पुढे या, असे अभाविपच्‍या कार्यकर्त्‍यांना आवाहन करताना केंद्रीय नितीन गडकरी यांनी त्‍यांसाठी एमएसएमईच्‍यावतीने सर्वती मदत करण्‍यात येईल असे सांगितले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या राष्‍ट्रीय अधिवेशनाच्‍या दुस-या दिवशी शनिवारी प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्‍कार समारोहाचे रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोज‍न करण्‍यात आले होते. त्‍यावेळी सूक्ष, लघु व मध्‍यम उद्योग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. याप्रसंगी मंचावर अभाविपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ. छगन पटेल, राष्‍ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी, स्‍वागत समिती सचिव समय बनसोड, दक्षिण क्षेत्राचे संघटन मंत्री आनंद रघुनाथ यांची उपस्थिती होती. कृषी क्षेत्रातील उल्‍लेखनीय योगदानासाठी बिहारचे युवा कार्यकर्ते मनिष कुमार यांना नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येत आहे. 1 लाख रुपये रोख, स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.

नितीन गडकरी म्‍हणाले, पूर्वी 85 टक्‍के लोकसंख्‍या गावात राहायची. पण आता 30 टक्‍के लोकांनी शहरांमध्‍ये स्‍थलांतरण केले आहे. ग्रामीण क्षेत्राचा देशाच्‍या जीडीपीमध्‍ये केवळ 12 टक्‍के सहभाग राहिला आहे. ग्रामीण भागात होणा-या उत्‍पादनांना भावच मिळत नसल्‍यामुळे शेतक-यांची स्थिती खराब होत चालली आहे. मनिष कुमार यांच्‍यासारखे युवक जैविक शेतीची गोष्‍टी करतात, ग्रामीण क्षेत्राच्‍या, शेतक-यांच्‍या उन्‍नतीसाठी कार्य करताना बघून आनंद होतो. त्‍यांना प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करतो, असे नितीन गडकरी म्‍हणाले.

प्रारंभी आनंद रघुनाथ यांनी प्रा. यशवंतराव केळकर यांच्‍या कार्याचा परिचय करून दिला. त्‍यांची आदर्श कार्यपद्धती आजही विद्यार्थ्‍यांसाठी मार्गदर्शक असल्‍याचे ते म्‍हणाले. सामाजिक समरसता, स्‍त्री-पुरूष समानता इत्‍यादी गुण त्‍यांनी अंगी बाणले होती. समाज, संघटन, व्‍यवसाय, वैयक्तिक आयुष्‍यात अतिशय संतुलित असे यशवंतराव केळकर हे उत्‍कृष्‍टतेचे एक उत्‍तम उदाहरण होते, असे ते म्‍हणाले. निधी त्रिपाठी यांनी मनिष कुमार यांचा परिचय करून दिला.

सत्‍काराला उत्‍तर देताना मनिष कुमार म्‍हणाले, हा पुरस्‍कार माझ्यासाठी आशीर्वाद आहे. माझे आदर्श नानाजी देशमुख यांच्‍या प्रेरणेमुळेच गावात जाऊन कार्य करू शकलो. समाजासाठी, पृथ्‍वीच्‍या भल्‍यासाठी आणि भावी पिढीसाठी चांगले करावे, हेच त्‍यामागचे उद्दीष्‍ट आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर विभाग प्रमुख अजय चव्‍हाण यांनी केले.