आंबेडकरी साहित्य आणि दलित चळवळीतील दुवा निखळला – डॉ नितीन राऊत यांची शोकसंवेदना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. १७ एप्रिल: डॉ. कृष्णा कांबळे यांच्या निर्वाणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि दलित चळवळीतील एका भक्कम दुवा निखळला, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी
शोक संवेदना व्यक्त केली आहे.

राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरीत्र साधने समितीचे डॉ. कृष्णा कांबळे सचिव होते. या काळात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशित करण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्यांच्या प्रयत्नातून नुकतेच ‘जनता’ खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी कटिबद्ध असताना काळाने आकस्मिकपणे घाला घातल्याने आंबेडकरी साहित्य चळवळीची अपरिमित हानी झाली आहे.

डॉ. कांबळे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांनी ठरविले असते तर खोऱ्याने पैसा कमावू शकले असते परंतु त्यांनी वंचित आणि उपेक्षित असलेल्या समाजाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यामुळेच त्यांनी खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिली. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना गरजूंना उपचार करण्यासाठी नेहमी तत्पर राहणाऱ्या डॉ. कांबळे यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीला विशेष महत्व दिले.

नागपुरात राज्य सरकारचे कॅन्सर हॉस्पीटल व्हावे, यासाठी डॉ. कांबळे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल नागपूरचा पालकमंत्री म्हणून त्यांचा नेहमीच मी ऋणी राहील. डॉ. कांबळे यांनी शासकीय महाविद्यालयात असताना कॅन्सर हॉस्पीटलसाठी प्रयत्न सुरू केले होते. नोकरीत असतानाही केवळ समाजाच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांना शब्दात व्यक्त करता येत नाही. उच्चशिक्षित असतानाही त्यांनी आंबेडकरी साहित्यापासून फारकत घेतली नव्हती. अत्यंत साध्या व आनंदी व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या डॉ. कांबळे यांनी निवृत्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अप्रकाशित साहित्य प्रकाशित व्हावे, यासाठी आयुष्य खर्ची घातले. या प्रामाणिक कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडक चरित्र साधने समितीच्या सचिवपदी नियुक्ती केली. या कामाला त्यांनी तत्परतेने सुरूवात केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ‘जनता’ पत्राचा एक खंड नुकताच प्रकाशित झाला आहे.

आंबेडकरी चळवळ व चळवळीला अभ्यासाची जोड आवश्यक असल्याच्या भूमिकेला ते बांधिल होते. त्यांच्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना एक वेगळा आदर होता. त्यांच्या निर्वाणाने आंबेडकर साहित्य व दलित चळवळीतील एक दुवा निखळला आहे. त्यांच्या निर्वाणाने माझीही व्यक्तीगत मोठी हानी झाली आहे. एक सच्चा मित्र व हितचिंतक मी गमावला आहे, अशा शब्दात डॉ. राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

डॉ. कृष्णा कांबळे