दारूचा साठा, लाखोंचा मुद्देमाल आणि तिघे आरोपी—अहेरी पोलिसांची धडक

तीन लाख ३३ हजारांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : अहेरी तालुक्यात अवैध दारूविक्री करणाऱ्यावर धडक कारवाई करत अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथील एका घरावर धाड टाकून तब्बल ३ लाख ३३ हजार १८० रुपयांचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व अहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

मुखबिराच्या खात्रीशीर माहितीवरून, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अहेरी पोलिसांनी मौजा आलापल्ली (अहेरीपासून ८ किमी पूर्व) येथे छापा टाकला. पंचासमक्ष घराची झडती घेतली असता घरात तसेच घराबाहेरील ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला.

या कारवाईत नरेश लक्ष्मण मिसाल (वय ३५),वनिता सचिन मिसाल (वय २६)आणि सुशीला मधुकर ईरबत्तनवार (वय ६०, तिघेही रा. वार्ड क्र. ०५, आलापल्ली)यांना आरोपी करण्यात आले आहे.

जप्त मुद्देमालात व्हिस्की, रम, बीयर, वोडका तसेच मोठ्या क्षमतेच्या विदेशी दारूच्या बाटल्या असून एकूण १७ प्रकारच्या दारूचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यात रॉयल स्टॅग, ओल्ड मोंक, ब्लॅक बकार्डी, ओकस्मिथ, ऑफिसर्स चॉइस, आयकोनिक व्हाइट, रॉकेट संत्रा देशी दारू आदी ब्रँडचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन अहेरी येथे गुन्हा क्रमांक ००६/२०२६, कलम ६५(ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी, पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे, महिला पोलीस हवालदार वंदना डोनारकर, पोलीस हवालदार विडपी, प्रशांत कांबळे, राकेश करमे, पोलीस शिपाई दरौ, जनबंधू, मपोहवा पेंदाम व राठोड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडून तपास सुरू आहेत..

Aheri Police