लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, इतलचेरू येथे समाज सहभाग आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळा विकासाला नवी गती मिळाली आहे. शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांमध्ये दर्जात्मक वाढ व्हावी या उद्देशाने माजी विद्यार्थी संघ, ग्राम शिक्षण सल्लागार समिती आणि खमनचेरू ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून शाळेला अत्याधुनिक साहित्य प्रदान करण्यात आले. या प्रसंगी खमनचेरूचे सरपंच सैलू मडावी यांनी समाजाच्या सहभागाशिवाय शाळांचा विकास वेगाने होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघाचे सदस्य बाबुराव मडावी, गुरुदास मडावी, किशोर पेंदाम, सतीश मडावी, दादाजी मडावी आणि जीवनकला आलाम यांच्या पुढाकारातून तसेच ग्रामपंचायतीतील सरपंच सैलू मडावी, ग्रामसेवक कोबे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या एकमताने शाळेला ५५ इंची सोनी अँड्रॉइड टीव्ही, चर्चेबल साउंड सिस्टम, दोन वॉल फॅन, संगणक प्रयोगशाळेसाठी वीस खुर्च्या आणि एक अधिकाऱ्यांसाठी ऑफिस चेअर अशी साहित्य भेट देण्यात आली. या सर्व साहित्यामुळे शाळेतील डिजिटल शिक्षण, कार्यालयीन व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणात लक्षणीय सुधारणा होणार आहे.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांना आमंत्रित करून शाळेच्या वतीने मुख्याध्यापक खुर्शीद शेख, अमित बंडावार, कुमरे आणि इतर शिक्षकांनी सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या पाठबळामुळे शाळेचा विकास अधिक प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सरपंच सैलू मडावी यांनी शाळेला पेसा निधीतून आणखी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
इटलचेरू शाळेला मिळालेल्या या साहित्य भेटीमुळे डिजिटल सुविधा, वर्गखोल्यातील अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळा परिवर्तनाच्या दिशेने समाज सहभागाचे हे एक आदर्श उदाहरण असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.