पूरग्रस्तांच्या मदतीला लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचा हात; ३,००० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसाने आणि कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याने अनेक गावांचा उध्वस्त कहर केला आहे. शेकडो घरे पाण्याखाली, हजारो कुटुंबं विस्थापित झाली, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला. या संकटकाळात लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची सीएसआर शाखा लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

२५ ऑगस्टपासून एलआयएफने साताऱ्यातील पाटण तालुक्यातील गावांमध्ये मदत कार्य सुरू केले. आतापर्यंत ३,००० हून अधिक आवश्यक मदत किट पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. ब्लँकेट, तांदूळ, डाळ, कणिक, तेल, मसाले, साबण, टूथपेस्ट आणि पिण्याच्या पाण्याचे कॅन यासारख्या जीवनावश्यक वस्तू काळजीपूर्वक या किटमध्ये समाविष्ट करण्यात आल्या.

१ सप्टेंबरपर्यंत नागपूरहून १२ ट्रकमधून २,५४६ क्रेट पाटण तालुक्यात पोहोचवण्यात आले. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून एलआयएफची टीम ही सामग्री थेट गरजूंना पुरवत आहे. पूराने उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक कुटुंबाला किमान जगण्यासाठी आवश्यक वस्तू वेळेवर मिळाव्यात, यासाठी स्वयंसेवक दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

एलआयएफच्या प्रतिनिधींनी सांगितले की, लोकांच्या सर्वात कठीण क्षणी त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी जबाबदारी आहे. साताऱ्यातील नागरिकांचा संघर्ष आम्हाला जाणवतो, आणि मदतीसाठी आम्ही सतत तत्पर राहू.

दरम्यान, साताऱ्यातील ग्रामस्थांनीही एलआयएफच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. पूर आला, घरं उद्ध्वस्त झाली, पण किमान मुलांच्या पोटात अन्न जाईल, अंगावर चादर येईल, हे मोठं दिलासादायक आहे, असे पूरग्रस्तांनी सांगितले.

लोकांच्या डोळ्यांतील वेदना कमी करण्याचा हा प्रयत्न असला, तरी या मदतीमुळे पूरग्रस्तांना जगण्याची नवी आशा मिळाली आहे. आपत्तीसमयी उद्योगसंस्था जबाबदारीने पुढे सरसावल्या, तर प्रशासनाला हातभार लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाचा विश्वास जिवंत राहतो. या संकटाच्या घडीतून समोर आले आहे.

सातारा पूर