लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,२१ नोव्हेंबर :
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे आयोजित गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (GDPL) च्या २०२६ टी-20 सीझनची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. स्पर्धेचे संपूर्ण नियम, सामन्यांचे स्वरूप आणि संघरचना जाहीर करताना आयोजकांनी यंदाच्या हंगामात महिला क्रिकेटचा स्वतंत्र समावेश ही सर्वात महत्त्वाची भर असल्याचे सांगितले. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी बहुल जिल्ह्यात महिलांसाठी क्रिकेटचे स्वतंत्र व्यासपीठ उभे राहणे हा स्थानिक क्रीडा संस्कृतीतील ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. आगामी सीझनची पात्रता फेऱ्यांना १६ जानेवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे.
यंदाच्या लीगमध्ये एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील १२ तालुका संघांसह लॉयड्स, कलेक्टर्स इलेव्हन, गडचिरोली जिल्हा पोलिस दल, CRPF, जिल्हा परिषद, कृषी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, वन विभाग आणि मीडिया संघ असे ८ विभागीय संघ समाविष्ट आहेत. सर्व सामने IPL आणि BCCI मानक T20 नियमांनुसार खेळवले जाणार असल्याने स्पर्धेची गुणवत्ता उच्च स्तरावर राहणार आहे.
या वर्षी संघ निवडीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मागील सीझनमधील कामगिरीच्या आधारे ८ संघांना थेट पात्रता देण्यात आली असून, उर्वरित १२ संघांमध्ये सिंगल-नॉकआऊट स्वरूपातील सामने खेळवले जातील. त्यातून निवडल्या जाणाऱ्या ६ संघांसह लकी ड्रॉद्वारे निवडण्यात येणारे आणखी २ संघ अशा एकूण १६ संघांची मुख्य स्पर्धा तयार होणार आहे. हे १६ संघ ४ गटांमध्ये विभागले जातील आणि गट-साखळी फेऱ्यांनंतर थेट प्लेऑफची रोमांचक लढत रंगणार आहे. प्रत्येक संघात १६ खेळाडू आणि ४ अधिकृत सदस्य असणे अनिवार्य ठेवले आहे. स्थानिक स्पर्धेला अधिक व्यापक रूप देण्यासाठी VCA-नागपूर झोन पात्रतेचे दोन बाहेरील खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली असून, सर्व खेळाडूंची नोंदणी व ओळखपत्र प्रक्रिया १० डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
स्पर्धेच्या तांत्रिक नियमांनुसार प्रत्येक सामना २० षटकांचा असणार आहे. प्रत्येक गोलंदाजाला कमाल ४ षटके टाकण्याची परवानगी असेल, तर पहिली ६ षटके पॉवर प्लेच्या स्वरूपात खेळवली जातील. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरद्वारे निकाल निश्चित करण्यात येणार आहे. सामन्यांची गती नियंत्रित राहावी यासाठी २० षटके ९० मिनिटांत पूर्ण करण्याची वेळमर्यादा देण्यात आली आहे. विजयासाठी २, बरोबरी किंवा निकाल न लागल्यास १ आणि पराभवासाठी ० गुणांची प्रणाली कायम ठेवण्यात आली आहे.
यंदाच्या GDPL मध्ये शिस्त, पारदर्शकता आणि सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व दिले जात आहे. ड्रेस कोड, अनुशासन, वाहतूक, भोजन आणि मैदानातील नियमांचे पालन बंधनकारक ठेवण्यात आले असून, नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. सामन्यांचे नियंत्रण निष्पक्ष राहावे यासाठी न्यूट्रल अंपायर, अधिकृत मॅच रिफरी आणि टीम इंटेग्रिटी ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. खेळातील शिस्त अबाधित राखण्यासाठी मैदानात मोबाईल फोन किंवा कोणतेही कम्युनिकेशन डिव्हाइस वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, सर्व मैदानांवर फर्स्ट-एड सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.
यंदाचा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महिला क्रिकेटचा स्वतंत्र समावेश. चार महिला संघ नॉकआऊट सामने आणि ग्रँड फायनलमार्फत स्पर्धा करणार असून, गडचिरोलीच्या क्रीडा इतिहासात हा पहिलाच मोठा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील प्रतिभावंत मुलींसाठी हे व्यासपीठ प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
GDPL २०२६ सीझनमुळे गडचिरोलीतील क्रिकेटला अधिक व्यावसायिक, नियोजित आणि सर्वसमावेशक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या स्पर्धांचा अनुभव, योग्य संधी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत जिल्हा क्रिकेट अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून होत असल्याचे लॉयड्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.