लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली / चंद्रपूर :
ग्रामीण आणि तळागाळातील क्रीडा प्रतिभेला व्यासपीठ देण्याचा संकल्प घेऊन कार्यरत असलेल्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीने जिल्हास्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. व्हॉलीबॉल आणि ग्रामीण कबड्डी या दोन्ही क्रीडाप्रकारांत लॉयड्सच्या संघांनी विजेतेपद पटकावत क्रीडा विकासाच्या संरचित प्रयत्नांना यशाची पावती दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोवारी येथे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १६ संघांच्या सहभागात लॉयड्स व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट खेळ सादर केला. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर १५–१० असा ठोस विजय नोंदवत लॉयड्स संघाने विजेतेपदावर नाव कोरले.
याचबरोबर, पारसलगोंडी येथील लॉयड्स ग्रामीण कबड्डी संघाने आलेंगा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ग्रामीण कबड्डी स्पर्धेत ४५ संघांमध्ये अपराजित राहून विजेतेपद पटकावले. प्रारंभापासून अंतिम फेरीपर्यंत संघाने दाखवलेली शिस्त, ताकद आणि सांघिक खेळ विशेष लक्षवेधी ठरला.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून उभारलेल्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीमुळे ग्रामीण युवकांना दर्जेदार प्रशिक्षण, क्रीडा सुविधा आणि स्पर्धात्मक संधी उपलब्ध होत आहेत. या अकादमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नैसर्गिक क्रीडा कौशल्याला दिशा मिळत असून, खेळाला करिअरचा मार्ग मिळवून देण्याचे प्रयत्न फळाला येताना दिसत आहेत.
या दुहेरी यशामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असून, स्थानिक समुदायातही क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे. नियोजनबद्ध, दीर्घकालीन आणि मूल्याधिष्ठित क्रीडा विकासाचा लॉयड्सचा संकल्प या विजयानिमित्ताने अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे.