कब्रस्तानच्या जागेवर पोलीस विभागाने अतिक्रमण केल्याचा स्थानिक मुस्लीम बांधवांचा आरोप

  • पोलीस मदत केंद्र जिमलगट्टा येथील प्रकरण  
  • जिमलगट्टा येथील स्थानिक मुस्लीम बांधवांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्याकडे केली तक्रार.
  • उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड पदाचा गैरवापर करीत असल्याचा मुस्लिम बांधवांचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २४ डिसेंबर:- अहेरी तालुक्यात येत असलेल्या जिमलगट्टा येथे मुस्लीम समाजाच्या कब्रस्थान असलेल्या जागेवर पोलिस विभाग अतिक्रमण करीत असल्याचा आरोप स्थानिक जिमलगट्टासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुस्लिम बांधवांनी केलेला आहे.

यासंदर्भातील तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विधानसभा क्षेत्राचे आ. धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे करण्यात आली आहे.

तक्रारीत मुस्लिम बांधवांनी म्हटले आहे की, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे शासनाकडून कब्रस्थानासाठी जागा मंजूर करून सात बारा, गाव नमुना आठ देण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून मुस्लिम समाज अंत्यविधी करिता या जागेचा वापर करीत आहे. या बाबतची सर्व माहिती असतांनाही उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड हे पदाचा दुरुपयोग करून या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुस्लिम बांधवांनी केलेला आहे.

गायकवाड हे मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात बसण्याच्या जागेवर तारांचे कंपाउंड लावून बळजबरीने अतिक्रमण करीत आहेत त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून अकारण तेढ निर्माण होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी व मंत्रीमहोदयांनी दखल घ्यावी, अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी या तक्रारीत केली आ.हे अजित शेख, अन्वर शेख, शब्बीर सय्यद, वाहिद खान पठाण, गफ्फार मोहम्मद शेख यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील मुस्लिम समाज बांधवांनी या संदर्भात निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री आणि देशमुख पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याने आता या प्रकरणाची तातडीने चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.