सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करणारा एक महान संशोधक हरपला

डॉ नितीन राऊत यांनी वाहिली डॉ सुधीर मेश्राम यांना श्रद्धांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १५ मार्च:  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी प्रमुख, राजीव गांधी जैव तंत्रज्ञान विभागाचे संस्थापक संचालक डॉ.सुधीर मेश्राम यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करणारा एक महान संशोधक आपल्यातून निघून गेला आहे अशी श्रद्धांजली ऊर्जामंत्री व नागपूर शहराचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी वाहिली.

डॉ. सुधीर मेश्राम यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. उच्च विद्याविभुषीत, व्यासंगी , सुसंस्कृतपणा व आंबेडकरी बाणा असलेले त्यांचे व्यक्तीमत्व काळाआड गेल्याने माझी व्यक्तीगत तसेच समाजाची न भरून येणारी  हानी झाली आहे. मेश्राम कुटुंबियांच्या दुःखात मी व महाविकास आघाडी सरकार सहभागी आहे असे म्हणत डॉ राऊत यांनी आपल्या शोकसंदेशात मेश्राम कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

शिक्षण क्षेत्र असो की संशोधन क्षेत्र या आघाड्यांवर डॉ. मेश्राम यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या हातून अनेक शास्त्रज्ञ विद्यार्थी घडले आहेत. नागपूर आणि विशेषतः विदर्भात त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्राचा प्रसार केला. सर्वसामान्यांना उपयुक्त वैज्ञानिक माहिती थेट त्यांच्यापर्यंत घेऊन जाणारे, शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या घरी व बांधावर  वैज्ञानिक क्रांती पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या प्रश्नांचा विविध अंगांनी विद्यापीठाकडून अभ्यास करून घेतला आणि आदिवासींच्या जीवनात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. नागपूर विद्यापीठा अंतर्गत  राजीव गांधी जैव तंत्रज्ञान विभाग उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. एवढेच नव्हे तर या जैवतंत्रज्ञान केंद्रात त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना आणून आधुनिक शेतीचे प्रशिक्षणही दिले.

भारताला २१ व्या शतकाचे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, शेतकरीकेंद्रित शेती, कौशल्य व संस्कारक्षमकेंद्रित युवक सक्षमीकरण, रिटेल बिझनेसकेंद्रित भारतीय अर्थव्यवस्था, मानवकेंद्रित सहयोगी समाज निर्मिती, हीच पंचसूत्री घेऊन त्यांनी काम केले. मात्र आता हे मिशन अपूर्ण राहिले. त्यांच्या पश्चात त्यांच्या विदयार्थी व आपण सर्वांनी ही पंचसूत्री हाती घेऊन हे मिशन पूर्ण केले पाहिजे आणि हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल असेही डॉ राऊत यांनी म्हटले आहे.

Dr. Sudhir Meshram