प्रेमाचे आमिष, मॉडेलिंगचे स्वप्न आणि देहव्यापाराचा कट – ब्रह्मपुरीचा मंजीत लोणारे अखेर जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: मॉडेलिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या दिल्लीतील एका २६ वर्षीय युवतीला ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून देहव्यापारात ढकलण्यात आल्याचा संतापजनक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ब्रह्मपुरीतील कुख्यात आरोपी मंजीत रामचंद्र लोणारे (वय ४४) याला देसाईगंज पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

‘इन्स्टाग्राम’वरून जाळं, ब्रह्मपुरीत थेट आमिष..

दिल्लीतील उत्तर-पूर्व परिसरातील ही महिला घटस्फोटित असून, ती आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांकडे राहत होती. तिची मंजीत लोणारेशी ‘इन्स्टाग्राम’वर २४ ऑगस्ट २०२४ रोजी ओळख झाली. स्वतःला मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित असल्याचे भासवून त्याने तिच्याशी सुसंवाद साधला आणि हळूहळू भावनिक जवळीक निर्माण केली.

त्यानंतर २७ डिसेंबर २०२४ रोजी तिने नागपूरला येण्याचा निर्णय घेतला. मंजीतने तिला ‘मॉडेलिंग प्रोजेक्ट’च्या निमित्ताने बोलावले आणि ब्रह्मपुरीला आपल्या घरी नेले. तेथे दोन दिवस तिला आपल्या घरी राहायला ठेवले आणि कुटुंबियांची ओळख करून दिली. विश्वास संपादन झाल्यानंतर ती दिल्लीला परत गेली. मात्र, ही फसवणुकीची केवळ सुरुवात होती.

लग्नाचं आमिष आणि गर्भधारणा..

त्यानंतर मंजीतने तिला पुन्हा बोलावून देसाईगंज येथे नेले आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे तिच्यावर मानसिक दबाव टाकत आणि तिची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचा फायदा घेत देहव्यापारात ढकलले. पीडिता सध्या दोन महिन्यांची गर्भवती आहे. या अत्याचाराची सखोल माहिती मिळाल्यानंतर २८ मे रोजी देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मंजीतवर यापूर्वीही होते गंभीर आरोप…

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंजीत लोणारे याच्यावर यापूर्वीही ब्रह्मपुरीत देहव्यापाराशी संबंधित गुन्ह्यांप्रकरणी त्याच्या पत्नीसह अटकेची कारवाई झाली होती. त्याच्या विरुद्ध महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, वेश्याव्यवसायाला प्रवृत्त करणे यासारखे गंभीर आरोप आहेत. तरीही तो काही काळ खुलेआम फिरत होता, यावरून स्थानिक यंत्रणांवर संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात..

या प्रकरणात देसाईगंज पोलिसांनी घेतलेली भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. तक्रार दाखल होऊनही तपासात दिरंगाई, आरोपीच्या पूर्व गुन्ह्यांबाबतची उदासीनता, आणि पीडितेच्या सुरक्षेची अपुरी व्यवस्था यावरून स्थानिक नागरिकांत अस्वस्थता आहे. काही सामाजिक संघटनांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

सामाजिक वास्तव आणि पोलिस-प्रशासनाची जबाबदारी..

एका घटस्फोटित, दोन मुलांची आई असलेल्या महिलेला ‘स्वप्न’ दाखवून सापळ्यात अडकवणे आणि नंतर तिच्या जीवनाचा खेळ मांडणे ही केवळ वैयक्तिक विकृती नाही, तर एक सामाजिक पातळीवरील गूढ गुंतागुंत आहे. इंटरनेटवरील ओळखींच्या माध्यमातून होणारी फसवणूक, महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्‍न, आणि गुन्हेगारांविरुद्ध निष्क्रीय यंत्रणा — या साऱ्याचा हा धक्कादायक आलेख आहे.

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये आता अशा प्रकारचे शहरी गुन्हे आणि सायबर माध्यमातून होणारी फसवणूकही चिंता वाढवणारी बाब ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपशीलवार तपास आणि दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.

Cyder crimegadchiroli policeInstagramInstagram fack idModeling